राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या भेटीतील आतली बातमी समोर, सलग एक तास कोणत्या मुद्द्यांवर खलबतं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे. या दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असावी, याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मालेगावात आज सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांची मालेगावत अनेक वर्षांनी ही सभा झाली. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलेलं होतं. या दरम्यान मुंबईत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरुन चर्चा झाली, या विषयाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबतची आतली बातमी सांगितली आहे. “राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली. आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली नाही”, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंसोबत नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली?
राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत राज्य सरकारला उद्देशून मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्याबाबतचा अल्टिमेटम दिला होता. तसेच मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केलेली. याच मुद्द्यावर आपली राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. “मशिदींवरील भोंगे याबाबत चर्चा झालीय. नियमांनुसार असेल ते केले जाईल. मनसे कार्यकर्त्यांवर ज्या केसेस टाकल्या आहेत त्या तपासून घेतल्या जातील. कोणावरही अन्याय करणार नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मुंबई येथे पत्रकारांशी संवाद… https://t.co/FPyoYTHMlH
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 26, 2023
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ सभा घेऊ नका तर राज्यातील जनतेसाठी कामं करा, शेतकऱ्यांसाठी काम करा, असं आवाहन राज ठाकरेंनी यांनी केलेलं. त्यावर आज एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ मी सभा घेत नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती बोलतोय आणि कामच करतोय. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर योग्यवेळी बोलेन”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकेकाळी एकाच पक्षात एकत्र काम करायचे. ते एकमेकांचे सहकारी होते. त्यामुळे त्यांच्यात वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असल्याचं याआधीदेखील समोर आलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. याशिवाय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या याआधी देखील भेटीगाठी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते त्यावेळी राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वत: राज ठाकरे यांना फोन करुन तब्येतीची विचारपूस केलेली. या सगळ्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध आगामी काळात आणखी चांगले होण्याची शक्यता आहे.