चोरांच्या उलट्या बोंबा काय, एकनाथ शिंदे यांनी वेदांताबाबत स्पष्टचं सांगितलं
वेदांत प्रकल्पाबाबत मी माझी भूमिका मांडली आहे. वेदांता हा जिव्हाळ्याचा विषय आहे. याला जबाबदार कोण, हे लवकरच बाहेर येईल. चोरांच्या उलट्या बोंबा कुणाच्या आहेत, हे लवकरच समोर येईल.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वरळी, शिवडी भागाला आज भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काही लोकांना पर्यायी व्यवस्था मिळाली होती. काही लोकांना मिळाली नव्हती. त्यांना भाडंही मिळत नव्हतं. ही तक्रार सगळ्यांची होती. म्हणून खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांनी या भागामध्ये मागणी केली होती. या भागातील अडचणी सोडविण्याची मागणी होती.त्यामुळं मी याठिकाणी आलो होतो. याठिकाणी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार कालिदास कोळमकर या सगळ्यांसोबत आम्ही पाहणी केली. अनेक लोकं भेटले. त्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या.
वरळी, शिवडी कनेक्टरच्या बाधितांवर अन्याय होणार नाही. भाडं तातडीनं अदा करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.पुनर्वविकासाचे प्रकल्प रखडले आहेत. या भागाचा पुनर्विकास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका बैठकीत सगळ्यांना बोलवून याचा न्यायनिवाडा करू, असं आश्वासनही शिंदे यांनी दिलं.
अनेक वर्षांपासून लोकं बाहेर आहेत. घरं खाली करून गेली आहेत. पण, त्यांचा पुनर्विकास थांबलेला आहे. न्याय देण्याचं काम शिवसेना-भाजप युतीचं सरकार नक्की करेल. सर्व रखडलेल्या प्रकल्पांवर सरकार अतिशय गंभीर आहे. माझी उपमुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात चर्चा झाली आहे. मुंबईतील सर्व रखडेलेले प्रकल्प मार्गी लावले पाहिजे. त्यासाठी सरकार गांभीर्यानं पाऊलं उचलत आहे, असंही शिंदे म्हणाले.
चोरांच्या उलट्या बोंबा
वेदांत प्रकल्पाबाबत मी माझी भूमिका मांडली आहे. वेदांता हा जिव्हाळ्याचा विषय आहे. याला जबाबदार कोण, हे लवकरच बाहेर येईल. चोरांच्या उलट्या बोंबा कुणाच्या आहेत, हे लवकरच समोर येईल.
पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपवून घेतले जाणार नाहीत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमित पाकिस्तान जिंदाबादचे नारे खपवून घेतले जाणार नाहीत. पोलीस विभाग या सर्व वृत्तीकडं गांभीर्यानं पाहतोय. त्यांचा कडेकोट बंदोबस्त गृहविभाग करेल. या देशात देशद्रोही लोकांना कुठलंही स्थान दिलं जाणार नाही. देशविरोधी, राज्य विरोधी कार्य कुणी करत असेल, तर त्यांचा समाचार गृहविभाग घेईल, असा सज्जड दमही शिंदे यांनी दिला.