मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Paawar) यांच्यावर सडकून टीका केली. विधी मंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या आधीच राजकारण तापताना दिसत आहे. कारण विरोधकांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. अजित पवार यांनी चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झालो असतो तर तो महाराष्ट्र द्रोह झाला असता, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याचा एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला.
“चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. खरंतर चहापानाच्या कार्यक्रमात विरोधकांनी आलं पाहिजे. सूचना केल्या पाहिजेत. विरोधकांची आज पत्रकार परिषद होती. त्यामध्ये त्यांची मानसिकता दिसलेली आहे. ते म्हणाले, चहापानावर बहिष्कार घातला. अजित पवार म्हणाले, चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. बरं झालं ते चहापानाच्या कार्यक्रमात सहभागी झाले नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“मी तर असं सांगतो, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. हसीना पारकर ही दाऊदची बहीण. तिला यांनी चेक दिलेत. ज्यांनी देशद्रोह केला त्यांचा राजीनामा घेण्याची त्यांनी हिंमत दाखवली नाही. बरं झालं! त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. त्यांच्याबरोबर चहा पिणं टळलं. बरं झालं! महाराष्ट्रद्रोह मोठा की देशद्रोह मोठा?”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.
“सत्तेतून बाहेर पडल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी फक्त आरोप करण्याचं काम सुरु केलेलं आहे. त्यांची मानसिकता आम्ही समजू शकतो. त्यामुळे अनेक वर्ष सत्तेत राहिल्यानंतर सत्तेतून बाहेर पडल्यानंतर मासा पाण्याविना तरफडतो तशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे आपण समजू शकतो”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“घटनाबाह्य सरकार काय? लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. घटना आहे, नियम आहे, कायदे आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना अधिकृत पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतपणे आम्हाला दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही. याचा अर्थ तुमच्या बाजूने निकाल दिला तर चांगलं. तुच्या विरोधात निकाल दिला तर वाईट? अशी दुटप्पी भूमिका तुम्ही कशी घेऊ शकता?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
“घटनाबाह्य, लोकांमध्ये रोष आहे, असं ते म्हणाले. मी काल पुण्यात होतो. अजित दादांचे सर्व कार्यकर्ते तिथे आहेत. आम्ही गेल्यानंतर चांगलं स्वागत झालं. लोकांचं प्रेम मिळालं. त्याची धास्ती झाली. आता पोटदुखी झाली. दहा-दहा सभा तर शरद पवारांनी घेतल्या. अजित पवार तर गल्लीबोळ्यात फिरत होते. आम्ही त्यांना काही म्हणालो कशाला प्रचार करायला येताय?”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.