शिंदे गटाकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदावर मोठं विधान, 2024मध्ये शिंदेंचं मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार?; खासदाराचं भाकीत काय?
एका नवीन व्यक्तीला केंद्रात मंत्रिपद दिलं. तरीही मी शिवसेना सोडली नाही. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत जायचं ठरवलं अन् बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई: भाजपने राज्यातील सत्तेची सूत्रे शिंदे गटाच्या हाती दिलं आहे. राज्यातील सर्वोच्च मुख्यमंत्रीपद शिंदे गटाला दिलं आहे. असं असलं तरी भाजपने 2024मध्ये आपला मुख्यमंत्री बसवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 2024मध्ये एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं भाकीतच शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
मालाड येथे एका कार्यक्रमात संवाद साधताना गजानन कीर्तिकर यांनी हे भाकीत वर्तवलं आहे. तसेच शिवसेना का सोडली? याचं कारण सांगतानाच मनातील खदखदही कीर्तिकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील 40 पैकी 20 महापालिका आपण जिंकणार आहोत.
मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा महापौर बसणार आहे, असं सांगतानाच 2024मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसतील ही आमची जिद्द आहे, असं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.
त्यांच्यात हिंमत नव्हती
मी 45 वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलं. त्यांनी मला अनेक पदं दिली. उद्धव ठाकरे यांच्या काळात मला तीनदा उमेदवारी मिळाली. कारण माझी उमेदवारी कापण्याची त्यांची आणि त्यांच्या जवळच्या लोकांची हिंमत नव्हती. पण बाळासाहेब गेल्यानंतर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी बाजूला सारलं.
एका नवीन व्यक्तीला केंद्रात मंत्रिपद दिलं. तरीही मी शिवसेना सोडली नाही. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत जायचं ठरवलं अन् बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला, असं त्यांनी सांगितलं.
म्हणून उठाव झाला
खोक्यांसाठी 40 आमदारांनी बंड केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन आपली विचारधारा बदलली. त्यामुळे आमदारांनी शिवसेनेला वाचवण्याचं काम केलं. सर्वात आधी शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. माज्या मनातही कुठे ना कुठे खदखद होती. त्यामुळे मीही बाहेर पडलो, असं त्यांनी सांगितलं.
सुनील प्रभूंचे आभार
यावेळी कीर्तिकर यांनी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचे आभार मानले. मी ठाकरे गटात असताना लोकसभा निवडणुकीवेळी मला इथले आमदार सुनील प्रभू यांनी मदत केली. मी त्यांचेही आभार मानतो, असंही ते म्हणाले.