Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड, भाई जगताप यांची उचलबांगडी
वर्षा गायकवाड या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री होत्या. धारावी विधानसभा मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार आहेत.
मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर माजी शिक्षणमंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत वर्षा गायकवाड?
वर्षा गायकवाड या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री होत्या. धारावी विधानसभा मतदारसंघाच्या त्या विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर गेल्या चार टर्म त्या सतत निवडून येत आहेत. प्राध्यापिका म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले आहे. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत.
भाई जगताप यांची उचलबांगडी
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड २०२१ मध्ये करण्यात आली होती. मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा चेहरा म्हणून भाई जगताप यांच्याकडे पाहिले जात होते. पण, निवडणुका होण्यापूर्वीच भाई जगताप यांची उचल बांगडी करण्यात आली. विद्यार्थी चळवळीपासून भाई जगताप काँग्रेससाठी काम करत आहेत. जगताप यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई मनपाची निवडणूक राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेसनेही मोर्चेंबांधणी सुरू केली. भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची निवड करण्यात आली.
मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील. येत्या काळात येणाऱ्या मुंबई मनपा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पक्षसंघटनेची बांधणी त्यांना करावी लागेल. महाविकास आघाडीशी असलेले संबंध टिकवून निवडणूक लढावी लागणार आहे.