FYJC Online application : 30 मेपासून भरता येणार अकरावीच्या प्रवेशाचे अर्ज, वाचा पूर्ण प्रक्रिया
विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल 10 महाविद्यालयांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर घेण्यात येणारी प्राधान्य फेरी यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : अकरावीच्या प्रवेशाचे सुधारिक वेळापत्रक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने याहीर केले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना 30 मेपासून ऑनलाइन अर्जाचा (Online application) भाग एक भरता येणार आहे. त्यापूर्वी 23 ते 27 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सरावही करता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांच्या (Junior college) नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. संचालक महेश पालकर यांनी परिपत्रक (Circular) काढले आहे. या परिपत्रकामध्ये विद्यार्थ्यांना यंदा केंद्रीय प्रवेश फेऱ्यांमधून किंवा कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधून प्रवेश घेता येणार आहे. भाग एक भरून पासवर्ड सेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व फेरीच्या वेळी अर्जाचा भाग दोन भरावा लागणार आहे. https://11thadmission.org.in/ या वेबसाइटवरून अर्ज भरता येणार आहे.
प्राधान्य फेरी रद्द?
विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल 10 महाविद्यालयांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर घेण्यात येणारी प्राधान्य फेरी यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात या फेरीबाबत कोणताही उल्लेख नसल्याने शिक्षण क्षेत्रात ही फेरी रद्द केल्याची चर्चा सुरू आहे.
कॉलेजांतील जागांचे गणित
कोटा/बिगर अल्पसंख्याक/अल्पसंख्याक विद्यालये
– केंद्रीय फेरी 85 टक्के 35 टक्के
– संस्थांतर्गत, 10 टक्के, 10 टक्के
– व्यवस्थापन, 5 टक्के, 5 टक्के
– अल्पसंख्याक, लागू नाही, ५० टक्के
वेळापत्रक
– विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी सराव – 23 ते 27 मे
– ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग एक भरणे, लॉग-इन आयडी आणि पासवर्ड मिळवणे – 30 मेपासून पुढे
– अर्जाचा भाग दोन भरणे – दहावीच्या निकालानंतर