धनुष्यबाण गोठवलंय, तरीही वापर कसा, असा नेटकऱ्यांचा प्रश्न, यापुढं धनुष्यबाण दोघांनाही वापरता येईल का?
तो काही काल-परवा प्रिंट करून आणला नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठविलंय. मात्र, आज वर्तमानपत्राच्या एका जाहिरातीमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या फोटोसोबत धनुष्यबाण हे चिन्ह दिसलं. यावरून नेटकऱ्यांनी आक्षेप घेतले आहेत. अंधेरी निवडणुकीसाठी वापरलेलं चिन्ह पोटनिवडणुकीनंतर वापरता येते का, असा प्रश्न निर्माण झालाय.
एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य पदावर मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन म्हणून दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. चर्चा या जाहिरातीवर नाही. तर मिलिंद नार्वेकर यांनी घातलेल्या टीशर्टवरील धनुष्यबाण चिन्हावर आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंय. मिलिंद नार्वेकरांचा हा फोटो का छापण्यात आला, असा आक्षेप नेटकऱ्यांनी घेतलाय.
भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी सामंजश्याची भूमिका दाखवली. तो फोटो जुना असावा, असं म्हंटलं. तो टीशर्टवरचा धनुष्यबाण चिन्ह आहे. तो काही काल-परवा प्रिंट करून आणला नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मशाल ही निशाणी स्वीकारलेली आहे. पुन्हा धनुष्यबाण मिळेल, ही अपेक्षा त्यांना असावी. पण, मशालीला पुढं घेऊन जाण्याची त्यांनी मानसिकता केली.
काही दिवसांपूर्वी कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले तेव्हासुद्धा गमच्यावर शिवसेना आणि धनुष्यबाणाचं चिन्ह होतं. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मतानुसार, दोन्ही बाजूच्या नेत्यांना धनुष्यबाण वापरला तरी त्यावर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही. कारण धनुष्यबाण हे चिन्ह अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी गोठविलं गेलं होतं.