मुस्लीम समाजालाही औरंगजेबाविषयी प्रेम नाही; नामांतराला विरोध करु नका: चंद्रकांत खैरे
औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होटबँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये. |
मुंबई: औरंगजेब हा अत्यंत दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम वाटत नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केले. औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा. औरंगाबादचे नामांतर हा अस्मितेचा प्रश्न आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले. (Shivsena leader Chandrakant Khaire on Congress stand over Aurangabad name changing issue)
औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर ‘सामना’तील रोखठोक या सदरातून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला होता. या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत, असा मजकूर या पत्रकात लिहला होता.
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना बाळासाहेब थोरात यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होटबँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये. बाळासाहेब थोरात यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून मार्ग काढतील. मात्र, औरंगाबादचे नामांतर होणार म्हणजे होणार, हे निश्चित आहे. आगामी काळात काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास मला वाटत असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’: बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडत आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील 5 वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या:
‘औरंगजेब कुणाला प्रिय?’ रोखठोकमधून काँग्रेसच्या ‘सेक्युलर’वादावर राऊतांचा निशाणा
औरंगाबादच्या नामांतरावर तोडगा निघणार?; अजितदादा, थोरात आणि देसाईंमध्ये खलबतं सुरू
आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावलं
‘नामांतरावरुन राजकारण खेळू नका, संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत’, बाळासाहेब थोरांतांनी CMO ला सुनावलं
(Shivsena leader Chandrakant Khaire on Congress stand over Aurangabad name changing issue)