EWS Certificate : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ
EWS Certificate Maratha Student : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला. त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. राज्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC (मराठा) कोट्या अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी, विद्यार्थ्यांना त्यांची स्थिती EWS वरून SEBC मध्ये बदलण्यासाठी तीन महिन्यांची देण्यात आली होती, परंतु 1400 विद्यार्थी प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरले. त्यांना आता दिलासा मिळाला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मराठा समाजातील मुलांनी अभियांत्रिकी वा इतर तत्सम अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवला होता. पण राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देणे बंद केले होते. त्याऐवजी त्यांना सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग(SEBC) प्रमाणपत्र देण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
त्यातच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) विद्यार्थ्यांना ईडब्ल्यएस प्रमाणपत्राची सक्ती केली होती. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले. याविषयीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यात येईल, असे आश्वासन यापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला.
हिवाळी अधिवेशनात उठला प्रश्न
हिवाळी अधिवेशनात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस ऐवजी एसईबीसी प्रमाणपत्र देण्याचा आणि यापूर्वी ईडब्लूएस प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणींचा पाढा वाचण्यात आला होता. त्यावेळी राज्य सरकार ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून देणार असल्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. कोणत्याही परिस्थितीत प्रवेश प्रक्रियेपासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, असे ते म्हणाले होते. तो शब्द आता सरकारने पाळला.
दोन प्रकारचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र
तहसील कार्यालयातून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यात येतात. एक राज्य सरकारने दिलेल्या नमुन्यात तर दुसरे हे केंद्र सरकारच्या नमूद नमुन्यात देण्यात येते. या दोन्ही प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे सारखीच लागतात. दोन्ही प्रकारचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र शैक्षणिक आणि नोकरीसाठी उपयोगी ठरतात.