वातानुकूलित रेल्वेच्या डब्याला आग; पश्चिम रेल्वेची एसी लोकल सेवा आज बंद
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ही वातानुकूलित ट्रेन पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली होती. | Western Railway AC local train
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात असणाऱ्या वातानुकूलित रेल्वेच्या डब्याला गुरुवारी रात्री कारशेडमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. ही वातानुकूलित ट्रेन मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये उभी होती. या ट्रेनला रात्री अचानक आग लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या प्रकारामुळे आज दिवसभर पश्चिम रेल्वेची एसी रेल्वे सेवा बंद राहणार आहे. (Fire in Western Railway AC local train coach)
वातानुकूलित ट्रेनच्या डब्याने पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमान दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत साधारण पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी ही आग विझवली. या आगीत डब्यातील वायरिंग आणि इलेक्ट्रॉनिक कॅबिनेट जळून खाक झाले आहे. प्रवासी बसत असलेल्या भागात कोणतेही नुकसान झालेले नाही.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ही वातानुकूलित ट्रेन पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली होती. BHEL कंपनीकडून ही ट्रेन तयार करण्यात आली होती. या गाडीचा विमा काढण्यात आला होता. परंतु, ही गाडी जळाल्यामुळे त्या जागी दुसरी ट्रेन चालवावी लागेल. परिणामी आज दिवसभर वातानुकूलित रेल्वेची सेवा बंद राहील. पश्चिम रेल्वेवर सध्या दिवसाला एसी लोकलच्या 10 फेऱ्या चालवल्या जातात. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
इतर बातम्या:
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर, ‘या’ शंभर ट्रेन एक जूनपासून धावणार
सणांच्या पार्श्वभूमीवर Railway ची मोठी घोषणा; 392 फेस्टिव्हल ट्रेन धावणार
रुग्ण सेवेसाठी’ बेस्ट’ धावणार, मिनी एसी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत
(Fire in Western Railway AC local train coach)