मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत नाजूक वळणावर आहे. एक वर्षाच्या आतमध्ये राज्याचे दोन बळकट प्रादेशिक पक्ष फुटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडण्याला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. पक्ष फोडून अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. 5 जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या भुजबळ नॉलेज सिटी येथे बैठक बोलावून आपली राजकीय ताकद दाखवून दिली. या बैठकीत अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली. आता पवार साहेबांनी आराम करावा व आम्हाला आर्शिवाद द्यावा, असं अजित पवार म्हणाले.
राज्याचे राजकारण ढवळून निघाालं असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या बंडाची माहिती शरद पवारांना नव्हती. अजित पवार यांना सरकारमध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय दिल्लीतून घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार लवकरच विधानसभेतून अपात्र होणार आहेत. पुढच्या महिन्यात 10 किंवा 11 ऑगस्टपर्यंत त्यांना अपात्र घोषित करण्याची शक्यता असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. एकनाथ शिंदेंकडे या कारवाई पासून वाचण्याचा कोणताही पर्याय नाही आहे. जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 16 आमदार अपात्र झाले तर, अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जावू शकत असल्याचं पृथ्वीराज चव्हाणा म्हणाले.
आम्हाला माहित आहे, अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. भाजप, आरएसएस आणि शिंदे गटात या निर्णयानंतर खूपच नाराजी आहे. शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्री पदाच्या प्रतिक्षेत असाताना ही अनपेक्षित घटना घडली. अजित पवारांच्या सोबत आलेल्या आमदारांपैकी 9 आमदारांना मंत्री पद देण्यात आली आहे. त्यानंतर 14 मंत्र्यांची जागा कॅबीनेट मध्ये शिल्लक आहे. आता या पैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे पाहावं लागेल. सध्या महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून हे राज्यासाठी चांगलं नसल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.