कुलाबामध्ये इमारतीला भीषण आग, आगीत होरपळून एकाचा मृत्यू
मुंबईतील कुलाबा येथील इमारतीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. रविवारी (21 जुलै) सकाळी 12.15 च्या सुमारास कुलाबाच्या ताज हॉटेलमागील चर्चील चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत अनेकजण अडकले होते.
मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील इमारतीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. रविवारी (21 जुलै) सकाळी 12.15 च्या सुमारास कुलाबाच्या ताज हॉटेलमागील चर्चील चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत अनेकजण अडकले होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाला लगेच घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. अग्नीशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
कुलाबा येथील चर्चील चेंबर ही फार जुनी इमारत आहे. ताज हॉटेलमागे असलेल्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज (21 जुलै) सकाळी 12.15 च्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की ता संपूर्ण मजल्यावर पसरली, धुराचे लोट उठू लागले. त्यामुळे या मजल्यावर राहाणारे लोक तिथेच अडकले. आग लागल्याचं कळताच, स्थानिकांनी अग्नीशमन दलाला माहिती कळवली. रविवार असल्याने रस्ता खाली होता, त्यामुळे अग्नीशमन दल लगेच घटनास्थळी पोहोचले.
आगीची भीषणता पाहाता जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तब्बल अडीच तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं. मात्र, या आगीत होरपळून शाम (वय 54) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. ही आग इतकी मोठी होती की, आगीच्या धुरामुळे आग्नीशमन दलाचे दोन जवानही यात जखमी झाले. जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही इमारत जुनी आहे आणि त्याच्या बांधकामात लाकडाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र आद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पाहा व्हिडीओ :