विनामास्क मुंबईकरांना दंड बजावल्यावर ‘मोफत’ मास्कही मिळणार
बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.
मुंबई : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने आता घेतला आहे. विना मास्क आढळलेल्या चार लाख 85 हजार 737 नागरिकांवर कारवाई करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत सुमारे दहा कोटी 7 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. (Free Mask to be given by BMC in Mumbai after fine for not wearing Mask )
बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोव्हिड-19 अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार आणि प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मार्च 2020 पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत चार लाख 85 हजार 737 नागरिकांवर कारवाई करुन सुमारे दहा कोटी 7 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्क न लावता किंवा अयोग्य रितीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरवला जाणार आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 14 ऑक्टोबर 2020 रोजी बैठक घेऊन विना मास्क फिरणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. विना मास्क नागरिकांवर कारवाई करुन दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शल ही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्वाची ठरते आहे.
मुंबईतील कोव्हिड रुग्णांची सद्यस्थिती :
#CoronavirusUpdates २८ नोव्हेंबर, सायंकाळी ६:०० वाजता
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ८८० आजवर बरे झालेले एकूण रुग्ण- २,५५,३४५ बरे झालेल्या रुग्णांचा दर- ९१% (Free Mask to be given by BMC in Mumbai after fine for not wearing Mask ) एकूण सक्रिय रुग्ण- *१२,७५३
दुप्पटीचा दर- १९६ दिवस कोविड वाढीचा दर (२१ नोव्हेंबर-२७ नोव्हेंबर)- ०.३५%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 28, 2020
संबंधित बातम्या :
मास्क घाला नाहीतर झाडू मारा! मुंबईत नियम तोडणाऱ्यांना अनोखी शिक्षा
मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांविरोधात महापालिकेची कारवाई ! 21 दिवसांत 82 हजार जणांवर कारवाई
(Free Mask to be given by BMC in Mumbai after fine for not wearing Mask )