अतिसारामुळे मृत्यू रोखण्यासाठी 20 लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस
अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील 1 वर्षापर्यंतच्या सुमारे 20 लाख बालकांना दरवर्षी मोफत लस देण्यात येणार आहे.
मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. या लसीकरणाची सुरुवात कसारा या आदिवासी भागापासून सुरुवात करण्यात आली. यानुसार राज्यातील 1 वर्षापर्यंतच्या सुमारे 20 लाख बालकांना दरवर्षी मोफत लस देण्यात येणार आहे.
कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी 5 बालकांना आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते रोटा व्हायरस लस देण्यात आली.
रोटा व्हायरसमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका बालकांमध्ये वयाच्या पहिल्या 2 वर्षांमध्ये अधिकच्या बालकांपर्यंत आढळतो. आतापर्यंत अतिसारामुळे दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 40 टक्के बालके ही रोटा व्हायरसने ग्रस्त असल्याचे समोर आले. अतिसाराचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कालपासून महाराष्ट्रात या लसीचा समावेश नियमित लसीकरणात करण्यात आला आहे.
त्यानुसार 34 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सुमारे 1 लाख 86 हजार अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याला 4 लाख 40 हजार लसींचे डोस आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले आहे. आतापर्यंत ही लस खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत होती. मात्र त्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येत असल्याने शासनाच्या आरोग्य केंद्रातून आता ही लस मोफत दिली जाणार आहे. 1 वर्षापर्यंतच्या बालकाला त्याच्या वयाच्या 6, 10 आणि 14 व्या आठवड्यात अशी तीनदा देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कसारासारख्या आदिवासी भागात पूर्वी मुलांमध्ये अतिसाराचे प्रमाण अधिक होते. याच भागापासून अतिसार प्रतिबंधक रोटा व्हायरस लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला हे सकारात्मक पाऊल असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.