अंत्यसंस्कारासाठी रांगा, पाच-सहा तास वेटिंग, मुंबईत आता अंत्यसंस्कारासाठीही ऑनलाईन बुकिंग
मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाईन मिळणार (Online Funeral Time Mumbai) आहे. लवकरच ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
मुंबई : मुंबईत आता अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाईन मिळणार (Online Funeral Time Mumbai) आहे. लवकरच ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. मुंबईतील स्मशानभूमींची सद्यस्थिती कळावी यासाठी महापालिका संगणकीय ‘डॅशबोर्ड’ विकसित करत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून ऑनलाईन वेळ दिली जाणार (Online Funeral Time Mumbai) आहे.
या महिन्याच्या अखेरीस ही सेवा कार्यान्वित होणार आहे. स्मशानभूमींच्या सद्यस्थितीची माहिती पालिकेच्या 1916 या हेल्पलाइनशी संलग्न केली जाणार आहे. कुठल्या स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार सुरू असून, पुढील अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाईन मिळणार आहे.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे मुंबईतील विविध भागांतील स्मशानभूमींवर ताण येत आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी पाच ते सहा तास ताटकळत राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवरच अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाईन दिली जाणार आहे.
ऑनलाईन प्रक्रियेसाठी हा ‘डॅशबोर्ड’ बनवला जात आहे. विद्युत किंवा गॅस दाहिनींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ही यंत्रणा काही कालावधीसाठी बंद ठेवली जाते. तर कधी देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी बंद ठेवावी लागते. या सर्व बाबी लक्षात घेता एका विद्युत किंवा गॅस दाहिनींमध्ये 24 तासात आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतात. या प्रकारची 18 चितास्थाने पालिका क्षेत्रात असून, त्यात 24 तासांत 144 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतात.
पारंपरिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरून अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत 219 चितास्थाने आहेत. या प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता 24 तासांत सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. तर 219 चितास्थानांची एकत्रित क्षमता ही 24 तासांत एक हजार 314 मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमींवर ताण येत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना वस्तूस्थिती कळावी यासाठी ही माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
मुंबईतील स्मशानभूमींची स्थिती
पारंपरिक, विद्युत, गॅसदाहिनी असलेल्या स्मशानभूमी : 46
चितास्थाने : 237
विद्युत वा गॅसदाहिनी : 11, त्यात शवदाहिनी : 18
संबंधित बातम्या :
मुंबईत दर दिवशी 50 हून अधिक कोरोनाबळी, कोणत्या वयोगटाला धोका जास्त?
Mumbai Corona | मुंबईत 798 कंटेन्मेंट झोन, साडेनऊ लाख घरे असलेले परिसर सील
मुंबईतील दुकानांच्या वेळेत बदल, व्यापारी संघटनांची मागणी पालिका आयुक्तांकडून मान्य