मुंबईत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला, अंधेरीत एका व्यक्तीला लागण
मुंबई, अहिल्यानगर आणि गोंदियामध्येही GBS चे रुग्ण आढळले आहेत. काही रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि काहींचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या दूषिततेचा संशय असून, आरोग्य यंत्रणा सतर्क आहे आणि उपचार सुविधा वाढवण्यात येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यात आतापर्यंत या आजाराचे 173 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 140 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. यातील २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आता मुंबईत गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS ची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS ची लागण झाली आहे. हा व्यक्ती अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहतो. सध्या त्याच्यावर महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली आहे.
मुरजी पटेल यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवावे, अशी सूचना केली आहे. तसेच या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जावेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
अहिल्यानगरमध्ये चार संशयित रुग्ण
तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीबीएस रुग्ण आढळत आहेत. अहिल्यानगरमध्ये जीबीएस आजाराचे चार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका अलर्ट मोडवर आली असून शहरातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर यांनी दिली आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने दोन कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात संशयित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांची तब्येत स्थिर आहे. मात्र पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळे हे आजार फोफावत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता अहिल्यानगर शहरात देखील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
गोंदियात एक रुग्ण
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात येरंडी/ देवलगाव गावात एक जीबीएसचा संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. देवलगावात राहणारा 14 वर्षीय मुलगा या आजाराच्या विळख्यात सापडला आहे. त्याच्यावर नागपूर येथील एम्स रुग्णालयात मुलांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. तो गेल्या 18 दिवसांपासून व्हेटिंलेटरवर आहे. मात्र या आजाराबद्दल जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अन्नभिन्न असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात गुलियन बेरी सिड्रोम (जीबीएस) आजाराने डोके वर काढले आहे. पुणे जिल्ह्यात शेकडो रुग्ण बाधित असल्याची माहिती आहे. आता याचे लोन गोंदिया जिल्ह्यातही पोहोचले आहे. जीबीएसची लागण झालेला हा मुलगा अर्जुनी मोरगाव येथील एका विद्यालयात येथे शिकत आहे. या संसर्गजन्य रोग नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून नये असे आवाहन करण्यात येत आहे.
नंदुरबारमध्ये जीबीएसचे दोन रुग्ण
तसेच नंदुरबारमध्ये जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्हीही रुग्ण लहान बालक आहेत. या दोघांपैकी एक रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. चिंताजनक असलेल्या लहान बालकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला आहे. ज्या गावातून हे रुग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणाचे पाणीचे तपासणी देखील केली जाणार आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्यास आरोग्य विभाग सतर्क आहे. 20 आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. जीबीएस आजारासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक अशा उपायोजना केल्या जात आहे.