मुंबईत होर्डिंग लावण्यासाठी नेमकी काय असते नियमावली? कशी असते प्रक्रिया?
घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे भलंमोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. जवळपास 120 जण या होर्डिंगखाली दबली गेली. अनेक जणांचा मृत्यू झाला. जखमींचा आकडा फार मोठा आहे. या घटनेला कारणीभूत ठरलेलं होर्डिंग हे बेकायदेशीर होतं. यानंतर बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दा तापला आहे. मुंबईत असे अनेक होर्डिंग पाहायला मिळतात. हे होर्डिंग कायदेशीर आहेत की बेकायदेशीर आहेत? हे तुम्ही-आम्ही सर्वजण जाणू शकतात. कारण होर्डिंग कुठे, कसे लावावे याबाबतचे नियम आहेत. याच नियमांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. या नियमावलीमुळे नागरिकांनी जागृत व्हावं आणि अशाप्रकारच्या बेकायदेशीर होर्डिंग प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं, जेणेकरुन घाटकोपरसारख्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.
यंदा मुंबईमध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालं अन् तो दिवस काळा ठरला. मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाईनगर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 74 जण जखमी झाले. मुंबईत आधी धुळीचं वादळ आणि काही वेळातच अवकाळी पाऊस आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग पडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. बेकायदेशीर होर्डिंगमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र घाटकोपरमधील ही पहिलीच घटना नाही. देशभरात अनेक ठिकाणी असे बेकायदेशीर होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. मागील वर्षी पुण्यातही सिग्नलला उभे असलेल्या लोकांच्या अंगावर होर्डिंग पडून पाच जण दगावले होते. आता घाटकोपरमध्येही तेच घडलं, बेकायदेशीर होर्डिंग लोकांच्या जीवाशी येत येतात तरीसुद्धा प्रशासनाकडून परवानगी कशी मिळते? होर्डिंग लावण्यासाठी कोणते नियम आहेत? याबाबत सविस्तर जाणून घ्या.
जाहिरात म्हणजे काय?
कोणतंही उत्पादन आणि त्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून जाहीर करणं किंवा माहिती देणं म्हणजेच जाहिरात होय. जाहिरातीची माध्यमं वेगवेगळी असू शकतात. जाहिरातींबाबत इतिहासातही अनेक गोष्टींच्या नोंदी सापडतात. वेळेनुसार जाहिरातींचे माध्यमं बदलत आहेत. पण त्याचा उद्देश तोच आहे. उपभोक्तापर्यंत किंवा लोकांपर्यंत आपल्या उत्पादकाची माहिती प्रभावीपणे पोहोचावी यासाठी जाहिरातीचा अवलंब केला जातो. जाहिरात ही रेडिओ, टीव्ही, होर्डिंग, भित्तीचित्र, भित्तीपत्रकं, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलक, दिशा दर्शख फलक किंवा कमानीवरील जाहिरात अशा अनेक गोष्टींमधून केली जाते.
ही जाहिरात कोणत्या प्रकारातील?
घाटकोपर येथे पडलेलं होर्डिंग हे जाहिरात फलक या प्रकरामध्ये मोडतं. जाहिरात फलक म्हणजे जाहिरातीच्या उद्दिष्टाकरिता किंवा कोणत्याही ठिकाणी जनतेला आकर्षित करण्याच्या दृष्टीकोनातून माहिती देण्यासाठी. व्यक्ती, सार्वजनिक कामगिरी, विक्रीचा माल इत्यादीची माहिती देण्यासाठी चित्र, शब्द किंवा माहितीसह जमिनीवरील बांधकामाचा कोणताही पृष्ठभाग किंवा इमारतीच्या छताचा कोणताही भाग किंवा छज्जावरील भाग ह्यावर उभारलेली जाहिरात फलक.
जाहिरात परवानगीचे सर्वसाधारण नियम :-
महापालिकेतील योग्य अधिकाऱ्याच्या लेखी परवनगीशिवाय कोणत्याही जाहिरात संस्थेस जाहिरात फलक लावता येत नाही. शोरुम्स, कार्यालये, पेट्रोलपंप, सिनेमागृह, मॉल्स् इत्यादी व्यावसायिय ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. एखाद्या जाहिरात संस्थेने अधिकाऱ्याकडून परवानगी न घेता अनधिकृतरित्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलं तर ती संस्था मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ४७१ अन्वये शिक्षेस पात्र ठरते.
मुंबई महापालिका जाहिरात फलकांचे प्रमाणित आकारमान
परिमंडळ ( झोन ) | विभाग |
---|---|
परिमंडळ एच १ | ए, बी, सी, डी, ई |
परिमंडळ एच २ | एच/ साऊथ, एफ/ नॉर्थ, जी/साऊथ, जी/उत्तर, एच/पूर्व, एच/पश्चिम |
परिमंडळ एच ३ | के/ पश्चिम, के/पूर्व, पी/दक्षिण, पी/उत्तर, आर/उत्तर, आर/दक्षिण, आर/मध्य, एस, एम/पूर्व, एम/पश्चिम, एन, ए, टी. |
जाहिरातीची सर्वसाधारण साईज काय
परिमंडळ १ | 10X20 फूट, 20X20 फूट |
---|---|
परिमंडळ २ | 10X20 फूट, 20X20 फूट, 30X20 फूट |
परिमंडळ ३ | 10X20 फूट, 20X20 फूट, 30X20 फूट, 40X20 फूट |
जाहिरातीची खरी साईज आणि लावलेली साईज
घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर पडलेल्या या होर्डिंगची साईज बेकायदेशीर होती. कारण प्रशासनाच्या नियमांच्या चौकटीत नव्हती. पडलेल्या होर्डिगची साईज 120 X 120 होती. रुंद रस्त्यावर म्हणजेच पदपथ वगळता 90 फूटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यावर 40 X 40 फूट इतक्या मोठ्या आकारमानाचे जाहिरात फलक उभारण्यास परवानगी असते. म्हणजे घाटकोपरमधील होर्डिंग हे जवळपास तीन पटीने मोठं होतं. होर्डिंगची नोंद थेट ‘लिम्का बुक रिकोर्ड’मध्ये झालेली होती, मुंबईमधील सर्वात मोठं होर्डिंग म्हणून त्याला ओळख मिळाली होती. जाहिरात फलकाचा खालील भाग जमीनीपासून 3.05 मीटर्स (१० फूट) पेक्षा कमी उंचीवर नसावा. कोणत्याही परिस्थितीत पदपथावर जाहिरात फलक प्रक्षेपित करु नयेत.
जाहिरात फलाकाची उंची किती कोणते रंग असावेत?
जाहिरात फलक जमिनीवर उभारण्यात येईल तेव्हा अधिकतम उंची म्हणजेच जाहिरात फलकाच्या वरील भागापर्यंतची उंची भूपृष्ठाच्या पातळीपासून फलकाचा तळ अंतर्भूत करुन 75फूटांपेक्षा अधिक नसावी. त्यावर वापरण्यात येणारे रंग लाल, पिवळा आणि हिरवा यांच्याशी मिळतेजुळते नसावेत. वाहतूक नियंत्रक दिवे स्पष्ट दिसण्यात अडथळा निर्माण होईल असे जाहिरात फलक लावण्यास परवानगी नसते.
एकदा निश्चित केल्यानंतर पुढील 10 वर्षांकरिता सदर मार्गदर्शक तत्वे कार्यरत राहतात. फक्त, शहर आणि नागरिकांच्या जीवित आणि सुरक्षिततेसंबंधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये महानगरपालिका आयुक्त लेखी कारणे नमूद करून सदर मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करु शकतात.
…तर पालिकेलाही परवानगी नाकारता येत नाही
जर पोलिस खात्यामार्फत विशेष आक्षेप घेतला गेला नसेल किंवा सभोवतालच्या रहिवाशांना डथळा होत नसे. तसेच त्यांना उजेड आणि हवा येण्यास प्रतिबंध होत नसेल आणि बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली 1991 आणि सदर मार्गदर्शक तत्वे यांना अनुसरून असल्यास सर्वसाधारणपणे जाहिरात फलकास परवानगी नाकारता येत नाही. आयुक्तांनी ठरवून दिलेल्या शर्ती आणि शुल्क अधिदानासापेक्ष, साधारणतः एक महिन्यापेक्षा जास्त नाही. इतक्या कालावधीसाठी व्यावसायिक उद्दिष्टाकरिता Fanding जाहिरात प्रदर्शनासाठी तात्पुरती परवानगी देता येऊ शकते.
जाहिरातीच्या परवानगीकरिता कसा करावा अर्ज
अर्जदार जाहिरात संस्थेला महानगरपालिकेच्या ज्या विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जाहिरात प्रदर्शित करायचीआहे त्या विभाग कार्यालयातील अनुज्ञापन विभागाकडे विहित नमुन्यात (परिशिष्ट-अ) जाहिरात प्रदर्शित करण्याच्या परवानगीकरिता अर्ज करावा लागतो. रीतसर भरलेल्या अर्जासोबत अर्जदाराला, जाहिरात फलक, इत्यादी प्रकारच्या जाहिरातींकरिता छाननी शुल्क भरावं लागते. व्यावसायिक जागेत जाहिरात प्रदर्शित करण्याकरिताच्या अर्जाच्या बाबतीत छाननी शुल्क भरण्याची आवश्यकता लागत नाही.
अर्जासाठी आवश्यक कादगपत्रे
ज्या जागेवर जाहिरात फलक लावायचं आहे त्या जागेच्या मालकांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC).
जाहिरात फलक उभारणार आहात त्या जागेचे 60 मीटर्सवरून काढलेले 10″ X 8″ चे दोन फोटो.
जागेपासून सरळ रेषेत आणि विस्तारित क्षेत्रात 50 मीटर्सच्या आतमध्ये झाडे किंवा इतर जाहिराती असल्यास त्यांचे अस्तित्त्व दर्शवणाऱ्या दोन प्रती.
“घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला लोहमार्ग पोलीसही जबाबदार”
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. पोलिसांनी जाहिरात कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. अनिल गलगली यांच्या मते 4 महाकाय होर्डींग आणि एक पेट्रोल पंप सुरु करण्यात आले आहे. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी दिली पण त्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेतली गेली नाही उलट पालिकेने मागील वर्षी या होर्डींग प्रकरणात कारवाई करण्यासाठी लेखी पत्र पाठविले. मुंबईत 40 X 40ची होर्डींग परवानगी पालिका देते पण येथे आकार 120 बाय 120 चा होता. 7 डिसेंबर 2021 रोजी लोहमार्ग पोलिसांनी एगो मीडिया कंपनीस कंत्राट दिले होते. याप्रकरणी चौकशी करत संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार असून मुंबई पोलिसांनी संबंधित अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. लोहमार्ग पोलिसांनी परवानगी देते भाडे घेत असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे.
घाटकोपर घटनेमध्ये पडलेले होर्डिंग बेकायदेशीर असून महापालिकेने इगो मीडिया प्रायव्हेट कंपनीने हे लावले होते. या कंपनीचे संचालक भावेश भिंडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे होर्डिंग दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर होते. यंत्रणेला आता 14 लोकांचा बळी गेल्यावर जाग आलीये. याआधीच होर्डिंगवर कारवाई केली असती तर हा मोठा अपघात टळला असता. सर्वसामान्यांनी जागृक व्हायला हवं, असे जर काही होर्डिंग तुमच्या परिसरात असतील तर तक्रार करा. होर्डिंगचे नियम जाणून घ्या आणि वेळीच यंत्रणेलाही जागं करा. नाहीतर अजुन निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो.