नवी दिल्ली : मुसळधार पावसाने (Heavy Rain) शेती आणि पिकचं चौपट करुन टाकलं आहे. उत्तर भारतात तर सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर महाराष्ट्र दक्षिणेतील काही राज्यांमध्ये अजून जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाच्या या लहरीपणाचा संपूर्ण देशाला फटका बसला आहे. महागाई गगनाला भिडली आहे. हिरवी मिरची, कांदा, अद्रक, बटाट, भेंडी, भोपळ्यासह जवळपास सर्वच भाज्यांनी दरवाढीचा नारा दिला आहे. टोमॅटो सध्या सर्वाधिक भाव खात आहे. टोमॅटो इतके महाग झाले आहे की, देशातील लाखो कुटुंबांनी टोमॅटोशी अघोषीत असहकार पुकारला आहे. एका महिन्यातच टोमॅटो 20 रुपये किलोहून थेट 140 ते 160 रुपयांवर पोहचले आहे. तर काही राज्यात टोमॅटोने 200 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. टोमॅटोच्या दरवाढीमुळे (Tomato Price Hike) जनतेच्या कल्पकतेला धुमारे फुटले आहे. कोणी टोमॅटोच्या संरक्षणासाठी बॉडीगार्ड ठेवले. तर कोणी वाढदिवसाला चक्क टोमॅटोचं महागडं गिफ्ट (Birthday Gift) म्हणून देत आहे.
वाढदिवसाला टोमॅटोचे गिफ्ट
वाढदिवशी टोमॅटो गिफ्ट देण्याचा प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील एका महिलेला वाढदिवशी टोमॅटो गिफ्ट देण्यात आले आहे. तिला वाढदिवसाच्या दिवशी नातेवाईक, मैत्रिणींनी सर्वात महागडे गिफ्ट म्हणून टोमॅटो दिले आहे. टोमॅटो भेट दिल्याने ही महिला पण खूप आनंदीत झाली आहे. महागाईच्या काळात एवढं महागडं गिफ्ट मिळणं हे भाग्य असल्याची प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे.
भेट म्हणून 4 किलो टोमॅटो
ही महिला ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपनगरातील आहे. सोनल बोरसे असं त्यांचं नाव आहे. सोनल बोरसे यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवसाला घरीच छोटेखानी पार्टी ठेवली होती. पार्टीला आलेल्या आप्तेष्टांनी तिला वाढदिवसाला भेट म्हणून 4 किलोहून अधिक टोमॅटो दिले. त्याचा एक व्हिडिओ काढण्यात आला. हे गिफ्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. टोमॅटोंनी यापूर्वी इतका भाव कधीच खाल्ला नव्हता. त्यामुळे आता लोकांच्या कल्पकतेला धुमारे फुटले आहे.
आनंदी आनंद गडे
व्हायरल व्हिडिओत ही महिला केक कापताना दिसत आहे. तर नातेवाईक एका टोपलीत टोमॅटो घेऊन आले आहेत. त्यांनी वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून टोमॅटो दिले आहेत. हे गिफ्ट मिळाल्याने मोठा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया बोरसे यांनी दिली. महिलेचा भाऊ, काका, काकू यांनी हे टोमॅटोचे गिफ्ट दिले आहे.
मुंबईत येथून पुरवठा
पावसामुळे अनेक ठिकाणी टोमॅटोला फटका बसला आहे. त्यामुळे मुंबईतही टोमॅटोचा पुरवठा कमी झाला आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या मुंबईत पुणे, नाशिक, जुन्नर येथून टोमॅटोचा पुरवठा होत आहे. असे असले तरी टोमॅटो महाग आहेत. एक किलो टोमॅटोसाठी मुंबईत 140 रुपये ते 200 रुपये खर्च येतो. तर काही ठिकाणी टोमॅटो 250 रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.