‘एक छंद गोपीचंद’ला लागली कुणाची दृष्ट; भाजपच्या गोटातूनच पडली पहिली ठिणगी, सांगलीतील कार्यकर्त्यांची थेट मुंबईत धडक
BJP Leader Gopichand Padalkar : लोकसभा आणि विधानसभेला भाजपसाठी काही जणांनी चांगलीच जमीन कसली. त्यांनी वातावरण निर्मिती केली. भाजप वाढवण्यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे. पण ज्यावेळी उमेदवारीची वेळ आली त्यावेळी या नव्या दमाच्या शिलेदारांना आता पक्षातंर्गतच विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. गोपीचंद पडळकर यांना सांगली, जतमधून का करण्यात येत आहे विरोध?
लोकसभा आणि विधानसभेच्या आखाड्यात भाजपने मैदान गाजवावे यासाठी अनेकांनी मेहनत घेतली. त्यात काही उमदे शिलेदार भाजपने जवळ केले. भाजपसाठी या नव्या दमाच्या शिलेदारांनी जीवाचे रान केले. भाजप वाढवण्यासाठी त्यांची धडपड सुरूच आहे. त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी झाली त्याचवेळी माशी नेमकी का शिंकली असा सवाल त्यांच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर विरोधकांना पण पडला आहे. गोपीचंद पडळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपसाठी पूरक भूमिका घेतली. त्यांनी थेट थोरल्या पवारांविरोधात अनेकदा बंड पुकारले. दंड थोपटले. पण आता विधानसभेत उमेदवारीची वेळ आली तेव्हा त्यांना भाजपमधूनच पहिला विरोध झाला. भाजपच्या गोटातूनच पहिली ठिणगी पडली. त्यांना विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांची थेट मुंबईत धडक दिली.
जतमधून हवी उमेदवारी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर इच्छुक आहेत. मात्र तालुक्यातील भाजप नेत्यांकडून त्यांना विरोध केला जात आहे. गोपीचंद पडळकरांच्या जतमधील उमेदवारी विरोधात भाजपा नेते एकवटले आहेत. भूमीपुत्राचा नारा देत गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारी विरोधात मुंबईत धडक देण्यात येणार आहे. त्यापूर्वी या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी पडळकर यांना जतमधून उमेदवारी देण्यास कडाडून विरोध केला. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यानेतृत्वाखाली भाजपाला सोडचिट्टी दिलेले माजी आमदार विलासराव जगताप, तमनगौडा पाटील यांच्यासह दुष्काळी जतच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांची बाजू मांडली.
भूमिपुत्राचा मुद्दा ऐरणीवर
तर यावेळी विलासराव जगतापांनी फडणवीसांकडे आपल्या उमेदवारीची मागणी केली. नाहीतर पडळकरां ऐवजी अन्य भूमिपुत्राला उमेदवार देण्याची मागणी केली आहे. तमन गौडा, रवी पाटील आणि समर्थकांना देखील उमेदवारीची मागणी करत पडळकरांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे. गोपीचंद पडळकरांच्या ऐवजी भूमीपुत्राला उमेदवार देण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अजून भाजपने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. परंतू या नवीन भूमिकेमुळे पडळकरांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागतो काय? की पक्षश्रेष्ठी भाजप कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात यशस्वी होतात हे लवकरच समजले. पण सध्या त्यांच्या उमेदवारीविरोधात पक्षातंर्गत एकसूर लागला हे नक्की.