इकडे मृत्यू, तिकडे ATM मधून 10 लाख गायब, 6 महिन्यांनी रहस्य उलगडलं!
मुंबई: एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही वेळातच त्याच्या एटीएमद्वारे एक दोन नव्हे तर तब्बल साडेदहा लाख रुपये गायब करण्यात आले. पोलिसांनी याबाबत तपास करुन जवळपास सहा महिन्यांनी खरं कारण शोधून काढलं आहे. काय आहे प्रकरण? 57 वर्षीय राल्फ कुटीनो हे गोवंडीतील निर्मलगंगा इमारतीत एकटेच राहात होते. 2 जून 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा रिचर्ड नावाचा […]
मुंबई: एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही वेळातच त्याच्या एटीएमद्वारे एक दोन नव्हे तर तब्बल साडेदहा लाख रुपये गायब करण्यात आले. पोलिसांनी याबाबत तपास करुन जवळपास सहा महिन्यांनी खरं कारण शोधून काढलं आहे.
काय आहे प्रकरण?
57 वर्षीय राल्फ कुटीनो हे गोवंडीतील निर्मलगंगा इमारतीत एकटेच राहात होते. 2 जून 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा रिचर्ड नावाचा एक भाऊ नेहरू नगर कुर्ला इथे राहतो. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर, राल्फा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी रिचर्डने शेजाऱ्यांची मदत घेतली. त्याने रेहान इस्माईल मेमन,कय्युम खान आणि इतर दोन अशा चार जणांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बोलावले.
त्यानंतर त्याच्या भावाने 3 दिवसांनी आपल्या भावाच्या घरात साफसफाई करण्यासाठी पुन्हा कय्युम खान आणि रेहान इस्माईल यांना बोलावले. त्यांनी घर तर साफ करून दिले, पण त्याच वेळी त्यांनी मृत्यू झालेल्या राल्फ कुटीनो यांचा मोबाईल आणि दोन एटीम कार्ड चोरले.
एटीएम कार्ड चोरुन त्याचा पिन नंबर याच कार्डवर मागे असलेल्या 12 अंकी नंबरपैकी शेवटचे चार अंकी नंबर पिन नंबर असल्याची माहिती, कय्युमने रेहानला दिली. त्यांनी कोटक महिंद्रा बँकेतून साडेनऊ लाख आणि स्टेट बँक ऑफ इंडियातून 1 लाख असे साडे दहा लाख वेगवेगळ्या दिवशी काढले.
हे प्रकरण उघडकीस आले कसे?
राल्फ कुटीनो यांचा एक भाऊ कॅनडामध्ये राहतो. तो गेल्या महिन्यात भारतात आला. त्याने त्याच्या भावाचे त्याचनंबरचे सिम कार्ड रितसर कागदपत्र देऊन घेतले. तेच कार्ड तो भारतात वापरु लागला. आरोपी जेव्हा पैसे काढू लागले तेव्हा त्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज येऊ लागले.
भावाचा मृत्यू होऊन पाच महिने झाले, तरी त्यांच्या नावे कोण पैसे काढतंय, हे त्यांना समजत नव्हते. त्यांनी याबाबत गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. कोटक महिंद्रा आणि स्टेट बँकेत जाऊन, तसेच एटीएम सेंटरमध्ये जाऊन, सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी रेहान इस्माईल हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, कय्युमने त्याला पिन नंबर सांगून या कामी मदत केल्याचे सांगितलं.
रेहानला अटक झाल्याचे समजताच कय्युम फरार झाला. त्याचा शोध गोवंडी पोलीस घेत आहेत.