250 जिलेटीन कांड्या आणि 250 डिटोनेटर्ससह परप्रांतियाला ठाण्यात अटक
ठाणे : दगडखाणीत स्फोट घडवण्यासाठी लागणाऱ्या 250 जिलेटीन कांड्या आणि 250 डिटोनेटर सह एका इसमाला दिवा आगासन रेल्वे फाटकाजवळ अटक करण्यात आली. गणपतसिंग सोलंकी असं मुंब्रा पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत […]
ठाणे : दगडखाणीत स्फोट घडवण्यासाठी लागणाऱ्या 250 जिलेटीन कांड्या आणि 250 डिटोनेटर सह एका इसमाला दिवा आगासन रेल्वे फाटकाजवळ अटक करण्यात आली. गणपतसिंग सोलंकी असं मुंब्रा पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटक आरोपी गणपत सिंग राऊत सोलंकी रा. जय गणेश अपार्टमेंट, मुंब्रा देवी कॉलनी दिवा. मूळचा राज्यस्थानमधील बिलवाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने ही स्फोटके राज्यस्थानमधून आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अटक आरोपीकडून 250 जिलेटीन कांड्या आणि 250 डिटोनेटरच्या कांड्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्याची बाजारात 15 हजार रुपय किंमत आहे.
आरोपी गणपतसिंग सोलंकी याच्यावर ठाण्यात कुठल्याही प्रकारचे पूर्वीचे गुन्हे नाहीत. मात्र राज्यस्थानमध्ये गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हा आठ महिन्यांपूर्वी दिव्यात राहायला आला होता. त्याने सुरुवातीला सोने-चांदी विक्रीचे दुकान सुरु केले होते. त्यानंतर त्याने ते बंद केले. सध्या तो ओला कार चालवित आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. दिवा आगासन रेल्वे फाटकात आरोपी रिक्षातून हे घेऊन चालला होता. त्याची चौकशी केल्यानंतर हा स्फोटकांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
अटक आरोपीने या स्फोटकांचा साठा राज्यस्थानमधून कुणाकडून कशासाठी घेतला. तो कुणाला देणार होता, त्याची विक्री खदानीमधील संबंधित व्यक्तीला विकणार होता काय? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे चौकशीत निष्पन्न होणार आहेत. शिवाय ठाण्यात त्याच्यावर गुन्हे नसल्याने आणि राज्यस्थानमध्ये गुन्हे दाखल आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत यावरून त्याने फी स्फोटके कशासाठी राज्यस्थानमधून वाहनातून ठाण्यात आणली याचा अंदाज लावता येणार आहे.
प्रथम दर्शनी ही स्फोटके खदानीत स्फोट घडविण्यासाठी लागतात. त्यांना विकण्याचा उद्देश असल्याचं दिसत आहे. सखोल चौकशीनंतर सत्य बाहेर येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ डी एस स्वामी यांनी दिली. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात स्फोटके बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.