मुंबईः शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्लाप्रकरणी अटकेत असलेले प्रमुख संशयित आणि एसटी आंदोलनाचे उत्तरार्धातले नेते अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे एकेक कारनामे आता समोर येत आहेत. त्यांनी राज्यभरातील तब्बल अडीचशे एसटी डेपोंमधून पैसे गोळा केले आहेत, अशी माहिती सिल्व्हर ओक हल्ला (Silver Oak Attack) प्रकरणात अटकेत असलेल्या अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी न्यायालयात दिलीय. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ झालीय. दुसरीकडे या हल्लाप्रकरणात पोलिसांनी अजित मगर नावाच्या आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात. आतापर्यंत 117 जणांवर कारवाई करण्यात आलीय. यातले मुख्य संशयित संदीप गोडबले, अभिषेक पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी यांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात नुकतीच अटक केलेल्या मगर याने महत्वाची भूमिका बजावल्याचे समोर येतेय. शिवाय संदीप गोडबोले हा पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईला आला होता. त्याने जयश्री पाटीलसह इतरांच्या उस्थितीमध्ये झालेल्या सात एप्रिलच्या बैठकीला हजेरीही लावली होती, असे वकिलांनी न्यायालयात सांगितले.
शरद पवार यांच्या घरावरील हल्लाप्रकरणातील संशयित अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपण पैसे घेतले नसल्याचे सांगितले. मात्र, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून आपल्याला पैसे गोळा लावले. विशेष म्हणजे यात गोडबोले सहभागी होता, अशी कबुली त्यांनी दिलीय. त्यामुळे सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात गेलाय.
पैसे गोळा करण्यासाठी सदावर्ते यांनी एक फॉर्म तयार केला होता. तो व्हॉटसअॅपवर फिरवण्यात आला. अॅफिडेव्हिट फाइल करायचे असल्याचे सांगत राज्यभरातील अडीचशे डेपोतल्या कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले. प्रत्येकाकडून साधरणतः 270 रुपये घेण्यात आले. या पैशातून सदावर्ते यांनी कारसह इतर मालमत्तांची खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलाने न्यायालयात हे आरोप फोटाळून लावले. आपण कोणाचीही फसवणूक केलेली नाही. माझ्या अशिलाने मला पैसे दिले. त्याची चौकशी करणे चुकीचे आहे. मी ऐंशी लाख गोळा केले, असे म्हणत असतील. मात्र, ती माझी फी होती. असा दावा सदावर्ते यांच्या वकिलाने कोर्टात केल्याचे समजते.