मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटीचं आंदोलन (St Worker Protest) पेटलं होतं. या आंदोलनाला शेवटी हिंसक वळण लागलं आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर आक्रमक आंदोलन झालं. या आंदोलनाप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची बाजु मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते गेल्या अनेक दिवसांपासून अटके होते. ते गुणरत्न सदावर्तें (Gunratna Sadavarte) तब्बल 18 दिवसांनंतर कारागृहाबाहेर आले आहेत. बाहेर येताच हम है हिंदुस्थानीच्या घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्या. हम है हिंदुस्थानी… या भारताच्या संविधानापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. ही आहे झेन सदावर्ते माझी 13 वर्षाची मुलगी आणि ही आहे माझी पत्नी जयश्री पाटील आणि या मित्र परिवाराने या अन्यायाविरोधात मला साथ दिली. अशी प्रतिक्रिया दिली. जेलमध्ये असताना सदावर्ते यांनी सरकारविरोधात उपोषण सुरू केल्याचीही माहिती समोर आली होती. गेल्याने अनेक दिवसांपासून त्यांना या कोठडीतून त्या कोठडीत जावं लागत होतं. मात्र आज त्यांना जामीन मिळाल्याने सदावर्ते बाहेर आले आहेत.
बाहेर आल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया देत सदावर्ते म्हणाले, महाराष्ट्रातील देशातील हिंदुस्थानी कष्टकरी हे आमच्या सोबत राहिले. यापुढे आमचा केंद्र बिंदू असेल भ्रष्टाचार, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करु. परंतू जय श्रीराम म्हणणारे, जय भीम म्हणणारे आणि वंदे मातरम म्हणणारे, हम है हिंदुस्थानी म्हणणारे जिंकत असतात. हा विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी महामंडळातील कष्टकरांच्या आहे. पुढेही बोलू आता तूर्त इतकंच, असे सदावर्ते सांगताना दिसून आले.
गुणरत्न सदावर्तेंवर अनेक ठिकाणी राज्यात गुन्हे दाखल आहेत. मुंबईत शरद पवारांच्या घराबाहेर जे आक्रमक आंदोलन झालं त्याप्रकरणी सदावर्ते अटकेत होते. त्यानंतर त्यांच्या अडचणी वाढत गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बीड, अकोला अशा अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत गेल्याने त्यांचे अनेक दिवस कोठडीत गेले. हे गुन्हे वेगवेगळ्या प्रकरणात दाखल झाले होते. मात्र मुंबईतील सदावर्ते यांच्यावरील गुन्हा हा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भडकावल्याप्रकरणी दाखल झाला होता. त्यानंतर जोरदार राजकारणही रंगल्याचे दिसून आले. गुणरत्न सदावर्ते हा भाजपने पाळलेला गुंड आहे अशी टीका महाविकास आघाडीने केली. तर भाजपकडूनही तसाच जोरदार पलटवार करण्यात आला. आता बाहेर येताच पुन्हा गुणरत्न सदावर्ते हे आक्रमक अंदाजात दिसून आले.