Raj Thackeray : आम्हाला गेल्या वेळेस निवडणुकीत थर्ड अंपायर मिळाला असता तर.., राज ठाकरेंकडून खंत व्यक्त
Raj Thackeray : राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी दादरमधील द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण केलं. यावेळेस राजा ठाकरे यांनी संबोधित करताना मनातील खंत व्यक्त करुन दाखवली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला. तर शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट या महायुतीतील मित्रपक्षांनाही यश आलं. तर दुसऱ्या बाजूला मविआचे 50 उमेदवारही विजयी होऊ शकले नाहीत. दुसऱ्या बाजूला मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही पराभव झाला. त्यामुळे मनसेच्या पदरी या विधानसभा निवडणुकीत भोपळा आला. मनसेप्रमुख यांनी याबाबत बोलताना खंत व्यक्त केली. दादरमधील शिवाजी महाराज पार्कात द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या जंयतीनिमित्ताने स्मृती स्मारकाचं उद्घाटन करणयात आलं. माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि या स्मारकाचे सल्लागार मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. राज ठाकरे यानंतर बोलत होते.
राज ठाकरे यांनी यावेळेस क्रिकेटमधील थर्ड अंपायर हा पर्याय किती निर्णायक असतो आणि तो निवडणुकीत असता तर किती निर्णायक असता याचं महत्त्वं नमूद करुन दाखवलं. तसच राजकारणात थर्ड अंपायर नसल्याने आम्ही काही करु शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
“आज इथे आचरेकर सरांचं स्मारक होतंय ही आनंदाची गोष्ट आहे. जसं तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेलं तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अंपायरने आऊट दिल्यावर तुमच्याकडे थर्ड अंपायरचा पर्याय असतो. आम्हाला गेल्या वेळेस निवडणुकीत थर्ड अंपायर मिळाला असता, तर अनेक निर्णय बदलले असते, कदाचित चित्र वेगळं असतं. पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही काही करु शकत नाही”,अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
आचरेकर सर आणि त्यांचे शिष्य
राज ठाकरे यांनी यावेळेस बोलताना आचरेकर सरांनी त्यांच्या शिष्यांवर केलेल्या संस्काराबाबत आणि त्यांच्या यशाबाबतही भाष्य केलं. “आज क्रिकेटही बदललंय, सर्वच गोष्टी बदलल्या आहेत. पण आचरेकर सरांनी या खेळाडूंवर काय संस्कार केलेत, हे आपल्याला या खेळाडूंना पाहून कळतं. क्रिकेट बदललं, सर्व गोष्टी बदलल्या. नवीन मुलं आली,नवीन मुलं खेळतायत. मुलं आजही म्हणतायत की आम्हाला तेंडुलकर, कांबळीसारखं खेळता येत नाही. मात्र सरांचे द्रष्टेपणा आणि या खेळाडूंची शिकण्याची वृत्ती त्यामुळे त्यांना ते यश आलं”, असं राज ठाकरे म्हणाले.