मुंबई : वाढच्या महागाईमुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला केवळ कात्री लागत नाही तर अक्षरश: खिसा कापला जातोय. पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol Diesel Rate) दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होतेय. भाजीपाल्यासह रोजच्या गरजेच्या वस्तूंमध्येही मोठी वाढ होत आहे. अशावेळी सर्वसामान्यांशी संबंधित आणि महागाईच्या (Inflation) झळा सोसायला लावणारी बातमी आलीय. कारण, मुंबईसह देशभरात हजामत आणि केस कापणं महाग होणार आहे. मुंबईत आज सलून, ब्युटीपार्लर (Salon, beauty parlor) कामगार युनियनची बैठक पार पडली. त्या बैठकीत हा दाढी, केस कापण्याच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे वाढलेला कौटुंबिक खर्च आणि व्यावसायिक खर्च, सलून सेवेचे भाव याचा योग्य ताळमेळ बसवण्यासाठी 1 मे 2022 रोजी कामगार दिनाचं औचित्य साधून संपूर्ण भारतभर कुशल सलून सेवकांच्या सलून सेवा भावात वाढ केली जाणार आहे.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दाढी, कटिंगच्या दरात 50 टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय मुंबई आणि महाराष्ट्राच्या बैठकीत घेण्यात आलाय. तर अर्धकुशल सलून सेवकांच्या दरात 30 टक्के भाववाढ जाहीर करण्यात आलीय. सलून ब्युटीपार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. वाढत्या महागाईमुळे सलूनमधील कामगारांना कौटुंबिक खर्च भागवणं कठीण जात आहे. त्यामुळे ही भाववाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलंय.
पेट्रोलियम कंपन्यांकडून आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार इंधनाच्या दराममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यभरात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये आहेत, तर डिझेलचे दर प्रति लिटर 96.67 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 120. 51 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 110.85 रुपये तर डिझेल 100.94 रुपये लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 115.12, 99.83 रुपये लिटर आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढलेला असल्याचं दिसून आलं आहे. या वाढत्या महागाईनं सगळ्यांचंच बजेट कोलमडलेलं आहे. रिझर्व बँकेनं किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा चार टक्के ठेवण्याचं ध्येस समोर ठेवलं आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात दुधाच्या किंमती, खाद्य पदार्थांच्या किंमती या सगळ्यांवर इंधन दरवाढीचा परिणाम जाणवला आहे.
महागाईचा फटका सगळ्यांना बसताना बघायला मिळतोय. जर किरकोळ बाजारातील महागाईचा दर असात वाढत राहिला तर आरबीआयला कर्जावरील व्याजाचा दरही वाढवावा लागू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या आरबीआयनं घातलेल्या किरकोळ बाजारातील महागाईच्या दरापेक्षा दोन टक्के जास्त महागाई दर असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.
इतर बातम्या :