रवी खरात, नवी मुंबई : अक्षय तृतीयेनिमित्त आंबा खरेदी करण्यासाठी मुंबई आणि पुणेकरांनी गर्दी केली आहे.
एककीडे पुण्यात आंबा महोत्सव सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने पुण्यात अंबा महोत्सवाचा आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबई बाजार समिती कोकणातून हापूस आंबे येत आहे. परंतु यंदा अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे आवक कमी झाली आहे. यंदा आंब्याचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी घटले असल्याचे उत्पादक सांगत आहेत. मार्केटमध्ये आंब्याची आवक घटल्याने मोठी भाव वाढ आहे.
किती आंबे दाखल
नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात अक्षय तृतीयेच्या निमित्त महाराष्ट्रातून पंधरा हजार आंब्याच्या पेट्या तर इतर राज्यातून पन्नास हजार हापूस आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या वेळेच्या तुलनेत यावर्षी अक्षय तृतीयाला आंब्याची आवक कमी झाली आहे.
कोकणातूनच सर्वाधिक आवक
उत्पादनात घट झाली तरी आहे त्या मालातूनच अधिकचा फायदा होण्याच्या दृष्टीने उत्पादकांनी गणिते मांडली होती. शिवाय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तरी आंबा विक्री होई या दृष्टीने नियोजनही करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई बाजार समितीमध्ये कोकणातून सर्वाधिक आवक होत आहे.
यंदा दर जास्तच
यंदा मार्च, एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे हापूस आंब्यांला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. अजूनही मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे आंब्याचे दर चढेच आहेत. एका पेटीचे दर दोन ते पाच हजार रुपये आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
उत्पादनावर परिणाम
निसर्गाच्या लहरीपणाचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला असला तरी एप्रिल अखेरला आंबा हा बाजारात दाखल होणार असल्याचा अंदाज आंबा उत्पादक संघाने व्यक्त केला होता. त्यानुसार थोड्या उशिराने का होईना मुख्य शहरातील बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला आहे. कोकणातून गेल्या आठ दिवसांपासून पुणे, मुंबई आणि वाशी मार्केटमध्ये आवक वाढली आहे.
कोकणातून गेल्या आठ दिवसांपासून पुणे, मुंबई आणि वाशी मार्केटमध्ये आवक वाढली आहे. अक्षय तृीतीयेच्या मुहूर्तावरच दरात घटही ही अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली.
कोकणातून कुठे निर्यात
कोकणातून सौदी अरेबिया, नेदरलँड, युरोपीय देश, अरब देश, कुवेत, अमेरिका, जर्मनी व चीनमध्ये हापूस आब्यांला खूप मागणी आहे. तसेच आब्यांबरोबर कोकणातून 10 हजार मेट्रिक टन पल्पची निर्यात होते. त्यातून 90 कोटी 39 लाख परकीय चलन अपेक्षित आहे.