महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर उत्तर प्रदेश सेंटर, आरोग्यमंत्री म्हणतात, ‘ही तर तांत्रिक बाब, पण दुरुस्ती केलीय’
आरोग्य भरती प्रक्रियेतील गोंधळावर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही तांत्रिक चुकी आहे परंतु आपण दुरुस्तीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं प्रवेशपत्र मेलवर देखील पाठवलं आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
परभणी : आरोग्य विभागाची गट क आणि ड संवर्गाची परीक्षा येत्या 25 आणि 26 तारखेला होणार आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्याच्या प्रवेशपत्रावर तसे नमूद करण्यात आहे. या भरती प्रक्रियेतील गोंधळावर खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही तांत्रिक चुकी आहे परंतु आपण दुरुस्तीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं प्रवेशपत्र मेलवर देखील पाठवलं आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या होऊ घातलेल्या परीक्षाचे नंबर उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे आले आहेत. पण हे केवळ नाशिक जिल्ह्यातील भिगवणच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर उत्तर प्रदेश सेंटर ही तांत्रिक चूक आहे. पण बहुतेक सदर सर्व्हर उत्तर प्रदेशात वापरले गेले असावे, म्हणून असा प्रकार झाला असावा, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. प्रत्येक विद्यार्थ्याला मेलवर सुद्धा आपण हॉल तिकीट पाठवले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
परिक्षार्थी उमेदवाराला उत्तर प्रदेशमधलं सेंटर, आरोग्यमंत्र्यांकडून विषय मार्गी
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी 25 सप्टेंबर आणि गट ड संवर्गातील पदासाठी 26 सप्टेंबर 2021 रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे प्रवेशपत्रदेखील वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र दत्ता पतुरकर या परीक्षार्थीला परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेश राज्यातील मिळाले आहे. हा अजब प्रकार समोर आल्यामुळे परीक्षेआधी योग्य ते नियोजन करावे, तसेच माझी अडचण दूर करावी अशी मागणी दत्ता पतुरकरकडून केली गेली. ज्यानंतर आरोग्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं.
भूलथापांना बळी पडू नका, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
दुसरीकडे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
सह्याद्री विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ. साधना तायडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सहाय्यक संचालक डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
हे ही वाचा :