राज्यपाल यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणीबाबत महत्त्वाची अपडेट, भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणी वाढणार?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जे आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत, त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी कधी होणार? या संदर्भात उद्या मुंबई उच्च न्यायालयात निश्चित होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जे आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत, त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी कधी होणार? या संदर्भात उद्या मुंबई उच्च न्यायालयात निश्चित होणार आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्यात यावे, याकरिता निर्णय घेण्यासाठी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करावी, अशी मागणी करत फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय.
याचिकाकर्ते दीपक जगदेव यांनी अॅड नितीन सातपुते यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने यावर उद्या मेंशन करण्याचा निर्देश वकील नितीन सातपुते यांना दिला आहे. वकील नितीन सातपुते उद्या मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर मेंशन करत उद्या सुनावणी संदर्भात मागणी करणार आहेत.
काय आहे याचिकेत?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्ते दीपक जगदेव यांच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली आहे.
“राज्यपाल यांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवली आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कारवाई राज्यपाल यांच्या विरोधात करण्यात यावी. याकरिता उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कलम 61 आणि 156 अंतर्गत राज्यपालांना हटवण्याचा निर्णय देण्यात यावा”, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात देखील राज्यपाल यांनी आक्षेपार्य विधान केलं होतं.
या सर्व मुद्द्यावरून विरोधी पक्षांसह अनेक संघटनांसह सर्वसामान्य जनता देखील आक्रमक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. तर इतर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेतर्फे राज्यपालांच्या विधानाचा निषेध करण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या पदावरून हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता राज्यपाल यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मागील आठवड्यात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी संदर्भात मागणी याचिकाकर्ते यांच्यावतीने करण्यात येईल.