पाऊस LIVE : धरणं भरली, नद्यांनी पात्रं सोडली, मुंबईत जोरदार, राज्यभरात दमदार पाऊस!
मुंबईसह उपनगरात आणि राज्यभरात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. जोरदार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबई : मुंबईसह उपनगरात आणि राज्यभरात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. जोरदार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रासहीत मुंबईतही येत्या 48 तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम तटाला येत्या 48 तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी दोनच्या सुमारास भरतीमुळे समुद्रात मोठ मोठ्या लाटा उसळल्या.
मुंबई पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पाणी साठल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तिकडे कल्याणमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल अर्धा तास उशिरा धावत आहेत.
जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दुपारनंतर ठप्प झाली होती. ती संध्याकाळी सातच्या सुमारास सुरु झाली.
Rain Live Update
पश्चिम आणि मध्य रेल्वे, ठाणे-पनवेल/वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु, फक्त सीएसएमटी-वाशी मार्गावरील वाहतूक अद्याप बंद
समुद्रात सर्वात मोठी भरती, दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी 4.90 मीटर उंचीच्या लाटा, गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडा, मुंबई महापालिकेचं आवाहन
रायगड,रत्नागिरी जोरदार पाऊस
कशेडी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कशेडी घाटातील वाहतूक मध्यरात्रीपासून बंद होती. पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात दोन ठिकणी दरड कोसळली होती. चोळई येथे कोसळलेली दरड बाजूला करण्यात आली आहे. युद्धपातळीवर दरड आणि मातीचा ढिगारा बाजूला करण्यात यश आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक आता सुरू झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे जमिनीला भेगा पडल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचली असून जमिनीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू
खेड येथील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहतूक 8 तासानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. काल रात्री 11.20 वाजल्यापासून जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, आज पुन्हा सुरु करण्यात आला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत ग्रुप तैनात करण्यात आला आहे.
पालघर – पालघर, मनोर, बोईसर, डहाणू परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. डहाणू येथील इराणी रोड पाण्याखाली गेल्याने मार्केट परिसरात पाणी भरले. सूर्या नदीवरील धामणी धरण आणि कवडासमधून 21600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कासा येथील सूर्या नदी आणि चारोटी येथील गुलझारी नदी दुथडी भरून वाहत आहे. वाऱ्यासह पावसाचा जोर आद्यपही कायम आहे. त्यामुळे काही भागात पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे- मुंबईसह ठाण्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. सकाळपासूनच ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ठाण्यातील अनेक सखोल भागात पाणी साचले. तर ठाण्यातील डॉ.आंबेडकर रोडवरील नाला तुडुंब भरला. नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने कंबरेपर्यंत पाणी साचलं. त्यामुळे पूर्ण रस्ता बंद करण्यात आला.
कृष्णा नदीने पात्र सोडलं
कोयना आणि चांदोली धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी 48 फुटांवर पोहचल्याने नदी पात्राबाहेर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
तिकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीन
कराड-
कोयना धरणाचे दरवाजे आज उघडण्यात येणार आहेत. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणात 88 TMC पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते 20 हजार क्यूसेकने पाणी सोडण्याची शक्यता आहे.
खडकवासला, पानशेत भरलं
खडकवासला धरणापाठोपाठ आता पानशेत धरणही 99 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संतततधार सुरूच असल्याने पानशेत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आज वाढणार आहे. खडकवासला धरणातून 11 वाजता 27 हजार 203 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. मुठा नदी पात्रातील रस्त्यांवर पाणी पोहोचणार असल्याने भिडे पुल पाण्याखाली आहे. नदीपात्रातील या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
नागपूर –
नांद नदीला पुन्हा आला पूर आल्याने अनेक शेतात पाणी शिरलं. जोरदार पावसाने नांद-शिडेश्वर धरणात अतिरिक्त जलसाठा झाल्याने धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. चार दिवसांपूर्वी नांद-शिडेश्वर धरणाचे 7 दरवाजे उघडल्याने नांद नदी तुडुंब भरून वाहत होती. त्यावेळी सुद्धा नांद, सावंगी (बुद्रुक) पिपळासह नदीकाठच्या गावात पाणी शिरलं होतं.
गडचिरोलीत मुसळधार
गडचिरोलीत गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गडचिरोलीत सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जवळपास 100 ते 150 गावांचा संपर्क तुटला आहे. छत्तीसगडमध्ये पडलेल्या पावसानं इंद्रावती नदीला पूर आला असून ही नदी गडचिरोलीतून वाहत असल्यानं आजूबाजूची गावे पाण्याखाली गेली आहेत.
चंद्रपूर वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणारे इरई धरण 97 टक्के भरले आहे. धरण भरल्याने धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे धरणातून 54.57 क्युबिक मीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
मुंबई, नाशिक, पुण्यात भिंती कोसळल्या
मुंबईत संरक्षक भिंत कोसळून आणखी एक बळी गेल्याचं समोर आलं आहे. चांदीवली येथील म्हाडा कॉलनीत एक संरक्षक भिंत कोसळल्यानं 42 वर्षीये चंद्रकांत शेट्टी या व्यक्तीचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले आहेत.
तिकडे जुन्या नाशिकमध्ये पुन्हा वाड्याची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. संभाजी चौक परिसरात असलेल्या एका जुन्या वाड्याची भिंत कोसळली असून सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
पुण्यातील मोती चौकाजवळील पायगुडे वाड्याची एका बाजूची भिंत कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. भिंत जीर्ण झाल्याने पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय.
गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ
महाराष्ट्रात पाऊस कोसळत आहेच, पण तिकडे गुजरातमध्येही पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. राजकोटमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. पुराचे पाणी रस्त्यांवर साचल्याने गाड्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तर उड्डानपुलावर गाड्याच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळाले.
हिमाचलमध्ये मुसळधार मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडतोय. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी होतेय. अतिवृष्टीमुळे जबली येथे राष्ट्रीय महामार्ग 5 वर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. यात काही झाडं आणि घरही कोसळले.