बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. मात्र या एन्काऊंटर प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. पोलिसांनी फेक एन्काऊंटर केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनीही पोलिसांनी पैसे घेत आमच्या मुलाला मारल्याचं म्हटलं आहे. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली असून आता अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला वेगळं वळण आलं आहे. हायकोर्टाने आता या प्रकरणाची दखल घेतली आहे.
अक्षय शिंदेला बनावट चकमकीत मारण्यात आलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर अक्षयच्या वडिलांकडून म्हणणं मांडण्यात आलं. आमच्या जीवालाही धोका असून अक्षयच्या आई-वडिलांकडून पोलीस संरक्षणाची मागणी केली. तुम्ही रीतसर याचिका करा, आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेऊ अशा सूचना न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी दिल्या आहेत. अक्षयच्या वडिलांकडून उद्याच यासंदर्भात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांच्यावतीने वकील अमित कटानवरे यांनी आज कोर्टासमोर ही माहिती दिली.
अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. डोक्यात लागलेल्या गोळीमुळे अती रक्तस्त्राव झाला. अक्षय शिंदेचे सात तास शवविच्छेदन सुरू होतं. संपूर्ण शवविच्छेदन प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. अक्षय शिंदेचे सात तास शवविच्छेदन सुरू होते. पाच डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केलं.