पुणे – ‘हिंदुत्व (Hindutva)ही काय वॉशिंग पावडर (washing powder)आहे का, तुम्हारे कमीज से कमीज अधिक सफेद, असं काही आहे का‘, असा प्रश्न विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray)पुण्याच्या सभेत लाफ्टर घेतला खरा, पण पुढच्याच क्षणाला त्याचे उत्तरही त्यांनी दिले. मात्र त्यांच्या या मुद्द्याने एका गंभीर मंथनाला जन्म दिला आहे. सध्या राज्यात हिंदुत्वाची गदा खांद्यावर घेऊन तीन पक्ष रणांगणात उतरले आहेत, आणि हे तिन्ही पक्ष आपलंच हिंदुत्व इतरांपेक्षा अधिक भगवं असल्याचा दावा करत आहे. यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना, भाजपा आणि मनसे हे एकमेकांवर टीका करण्याची संधीही सोडताना ते दिसत नाहीत. यात मतदारांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनातला गोँधळ मात्र अधिक वाढताना दिसतो आहे. नेमकं कुणाचं हिंदुत्व कसं आहे, हे सामन्य जनतेलाही कळत नाही. याच परिस्थितीत गेल्या काही दिवसांत शिवसेना, भाजपा आणि मनसेनं आपआपलं हिंदुत्व काय आहे, हे सांगितलं आहे. जाणून घेूऊयात ज्याचं त्याचं हिंदुत्व.
उद्धव ठाकरेंच्या सभेवर टीका करताना राज ठाकरे यांनी हिंदुत्व ही काय वॉशिंग पावडर आहे का, तुमच्यापेक्षा आमची चांगली असे विचारत उद्धव ठाकरेंवर टीका केली. मनसेचे हिंदुत्व हे निकाल देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. देशात पहिल्यांदाच भोंग्यांबाबात आंदोलन केले आणि ९० सकाळचे मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी झाला असे त्यांनी सांगितले. हे आंदोलन थांबवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रझा अकादमीच्या कार्यक्रमात झालेल्या अत्याचारानंतरचा मोर्चा, बॉलिवूडमधील पाक कलाकारांना हाकलवून दिले त्याची आठवणही त्यांनी करुन दिली. मराठीच्या किंवा हिंदुत्वाच्या प्रश्नावर एक तरी गुन्हा उद्धव यांच्यावर दाखल आहे का, असा सवालही त्यांनी केला. देशात समान नागरी कायदा लागू व्हावा, संभआजीनदर हे नामांतर व्हावे, अशी मागण्याही त्यांनी केल्या. या निजामाच्या औलादी इकडे वळवळ करायला आल्या, त्यांना भुसभूशीत जमीन दिली कुणी, असा सवाल त्यांनी विचारला. महाविकास आघाडीत जाऊन शिवसेना बाळासाहेबांची प्रतिष्ठा कमी करत असल्याची टीका त्यांनी केली.
त्यापूर्वी शिवसेनेने बीकेसीवर घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी सातत्याने भाजपाला तुमचे हिंदुत्व काय आहे, असा सवाल केला. आमचे हिंदुत्व हे ह्रद्यात राम आणि हाताला काम असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. एखाद्याचे घर जाळणे सोपे असते, पण एखाद्या घरातील कुणाची चूल पेटली पाहिजे, असे हिंदुत्व असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतही या सभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. बाबरी पाडली तेव्हा शेपूट का घातली असा सवालही त्यांनी केला. काश्मीरमध्ये कुठल्या तोंडाने मुफ्ती मोह्ममद सरकारमध्ये सामील झालात, काश्मिरी पंडितांच्या हत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करत भाजपाच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले.
संस्कृती आणि धर्माचं रक्षण करण, हे भाजपाचे हिंदुत्व आहे, असे सांगत फडणवीसांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर बीकेसीच्या सभेनंतर उ. भारतीयांच्या सभेत दिलं. राज्यात हनुमानचालिसा हा राजद्रोह आणि औरंजगेजाबाच्या कबरीवर जाणे हा राजशिष्ठाचार झाला असला तरी, आम्ही अद्याप तलवारी म्यान केलेल्या नाहीत असं सांगत फडणवीसांनी जोरदार मुकाबला करणार असल्याचे सांगितले होते. कारसेवकांची गंमत करणाऱ्यांनी तेव्हा लाठ्या कुणी खाल्ल्या होत्या, याची आठवणही फडणवीसांनी करुन दिली होती. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात आलो नाही असेही ते म्हणाले होते. अयोध्या आणि काश्मीर आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगत त्यावेळी कुणी शेपूट घातली होती असा सवाल त्यांनी विचारला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार हे स्वातंत्र्य चळवळीत होते, आणिबाणीत आम्ही होतो, असेही फडणवीस म्हमाले होते. शिवसेना पक्ष अस्तित्वात नव्हता त्याआधीपासून हा संघर्ष सुरु आहे, याची आठवणही त्यांना करुन दिली होती.