तर अमित शाह यांनी गृहमंत्रीपदावर राहू नये; संजय राऊत यांनी सुनावले
पेगाससबाबतही आम्ही प्रश्न विचारले होते. तेव्हा त्यांनी कोर्टातून क्लिनचीट घेतली होती. नंतर न्यायाधीशांवर कसे मेहरबान झाले ते तुम्ही पाहिलं. हा क्लिनचीटचा कारखाना आहे. हिडनबर्ग बाबत सरकारने मौन पाळलं आहे.
मुंबई : काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुनावले आहे. आजही हजारो काश्मिरी पंडीत काश्मीरवरून जम्मूला का आले? काश्मिरी पंडितांच्या हत्या का झाल्या? त्यांना संरक्षण देऊ शकला का? त्याचं उत्तर द्या. आजही काश्मिरी पंडितांची घरवापसी करायला तयार नाही. हे कुणाचं अपयश आहे. आजही कश्मीरी पंडित जम्मूच्या रस्त्यावर न्यायासाठी बसलेत हे अमित शाहह यांना माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदावर राहू नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शाह यांना सुनावले आहे.
निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. दूध का दूध पानी का पानी झालं आहे, असं अमित शाह काल म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी खोचक पलटवार केला आहे. अमित शाहकाय बोलतात याला महाराष्ट्रात कोणीही गंभीरपणे घेत नाही. ज्यांचा विश्वास सत्य आणि न्याय खरेदी करण्यावर आहे त्यावर काय बोलायचं. कोण जिंकलं आणि कोण हारलं हे महाराष्ट्रातील लोक दाखवून देईल. संधी येईल तेव्हा लोक सांगतीलच, असं संजय राऊत म्हणाले.
जिंकण्यासाठी ईव्हिएम हॅक
हिडनबर्ग नंतर टीम जॉर्जचा रिपोर्ट आला आहे. ज्या पद्धतीने हिडनबर्ग नंतर जो रिपोर्ट आला आहे, त्यात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. 2014 पासून निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएम हॅक करण्यात आलेअसल्याचं त्यातून उघड झालं आहे. प्रत्येक निवडणुकीत हेराफेरी झाल्याचं उघड झालं आहे.
विरोधकांना बदनाम करण्यासाठी इस्रायली कंपनीची मदत घेण्यात आली हे सुद्धा स्पष्ट झालं आहे. हिडनबर्गच्या रिपोर्टवर उत्तर दिलं गेलं नाही. तसंच टीम जॉर्जच्या प्रश्नावर उत्तर दिलं जाणार नाही, असं राऊत म्हणाले.
न्यायाधीशांवर मेहरबान
पेगाससबाबतही आम्ही प्रश्न विचारले होते. तेव्हा त्यांनी कोर्टातून क्लिनचीट घेतली होती. नंतर न्यायाधीशांवर कसे मेहरबान झाले ते तुम्ही पाहिलं. हा क्लिनचीटचा कारखाना आहे. हिडनबर्ग बाबत सरकारने मौन पाळलं आहे. मोदी आपल्या एका मित्रासाठी काय करत आहे हे राहुल गांधी यांनी समोर आणलं. त्यावर ते अजून उत्तर देऊ शकलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.