लॉकडाऊनबाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा

| Updated on: Feb 22, 2021 | 9:18 PM

राज्यभरात लॉकडाऊनबाबत खोटी माहिती सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशाप्रकारे खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

लॉकडाऊनबाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. शाळा बंद करण्यासोबतच अनेक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुकानांना वेळाही ठरवून दिल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊनबाबत खोटी माहिती सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशाप्रकारे खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.(Anil Deshmukh orders stern action against those who spread false information about lockdown)

‘महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत’, असं ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर आला लगाम लागण्याची शक्यता आहे.

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना लॉकडाऊनबाबत काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. मात्र, त्यांनी कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राला लॉकडाऊन लागू केला जाईल, अशी घोषणा केलेली नाही. असं असलं तरी 1 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्याची खोटी माहिती सध्या सोशल मीडियावरुन पसरवली जात आहे.

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेलाच एक प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? हा सवाल ठाकरे यांनी जनतेला विचारला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही? याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत.

सोमवारी कोरोना रुग्णांच्या आकडेवारी घट

राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी काहीसा कमी आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 5 हजार 35 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 99 हजार 982 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.96 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.46 टक्क्यांवर आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown Updates : …तर आपल्याला लॉकडाऊन करावा लागेल : मुख्यमंत्री

मुंबईतील ऑफिसचं काय करायचं? मुख्यमंत्र्यांची सूचना कंपन्या पाळणार?

Anil Deshmukh orders stern action against those who spread false information about lockdown