Mumbai: 150 रुपयांत करा जिवाची मुंबई, बेस्टची हो-हो बस सेवा आता सीएसएमटीवरून सुरू
बेस्ट उपक्रमाच्या महापालिकेतील विलीनीकरणाला आज रविवार, 7 ऑगस्टला 75 वर्षे पूर्ण होत असून 'बेस्ट' उपक्रमातर्फे 'अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यात येणार आहे.
मुंबई, पर्यटकांना मुंबई दर्शन (Mumbai darshan) घडविणाऱ्या खासगी बसेसची संख्या मोठी आहे. मात्र जीवाची मुंबई करायला आलेल्या सर्वसामान्य माणसाला खाजगी बसचे भाडे परवडत नाही. 2019 च्या डिसेंबर महिन्यात सर्वसामान्यांना मुंबई दर्शन घडविण्यासाठी बेस्ट (Best) ने लंडनच्या धर्तीवरील ‘Hope on- Hope off‘ म्हणजेच हो-हो (Ho Ho) बस सेवा सुरु केली होती. पर्यटकांचा याला चांगला प्रतिसाद आहे. बेस्ट उपक्रमाच्या महापालिकेतील विलीनीकरणाला आज रविवार, 7 ऑगस्टला 75 वर्षे पूर्ण होत असून ‘बेस्ट’ उपक्रमातर्फे ‘अमृत महोत्सव’ (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने उपक्रमांच्या वतीने मुंबईकरांकरिता विविध योजना सादर केल्या जाणार असून ‘होप ऑन-होप ऑफ’ या एसी इलेक्ट्रिक पर्यटन बससेवेचा सुरुवातीच्या थांब्यात बदल केला आहे. तो आता सीएसएमटीपासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्याची लांबीही कमी करण्यात आली आहे.
या बसेसचा सुरुवातीचा थांबा आता सीएसएमटीच्या बस स्थानकाच्या परिसरातून सुरू होणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून दर एका तासाच्या अंतराने पर्यटकांसाठी बस फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. या बसचे पर्यटन शुल्क प्रतिव्यक्ती 150/- रुपये इतके ठेवण्यात आले आहे. पर्यटकाने एखाद्या पर्यटनस्थळी बसगाडीतून उतरून त्या पर्यटन स्थळाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर पुढच्या फेरीच्या बसगाडीतून पुढील पर्यटन स्थळापर्यंत त्याच तिकिटावर प्रवास करता येईल अशी सुविधा असणार आहे. पर्यटकांना या पर्यटन बससेवेव्यतिरिक्त बेस्टच्या इतर बसमार्गांचा वापर करूनदेखील मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील, असे बेस्टचे जन संपर्कप्रमुख मनोज वराडे यांनी सांगितले.
असा असेल मार्ग
हो-हो बससेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होऊन म्युझियम, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बाबुलनाथ, पेडर रोड, हाजी अली, महालक्ष्मी रेसकोर्स, धोबीघाट (महालक्ष्मी स्थानक) , जिजामाता उद्यानमार्गे जे. जे. उडाणपुलावरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी चालविण्यात येणार आहे. तरी सर्व पर्यटक, मुंबईकरांनी या बससेवेचा लाभ घेऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.