गँगस्टरशी व्यवहार करणारा माणूस केवळ दलाल कसा असू शकतो?, इक्बाल मिर्चीप्रकरणी कोर्टाची कुणाला चपराक?
Iqbal Mirchi : इक्बाल मिर्चीसंदर्भात विशेष न्यायालयाने आरोपीला जोरदार झटका दिला. इक्बालच्या केवळ मालमत्तेचा व्यवहार आपण बघत असल्याचा कांगावा न्यायालयात टिकला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने प्रकरणात इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेचा व्यवहार करणारा माणूस केवळ दलाल असल्याचा दावा करू शकत नाही, अशी चपराक दिली.
गँगस्टर इक्बाल मिर्चीशी संबंधित एका प्रकरणात आरोपीला मुंबई सत्र न्यायालयाने जोरदार चपराक लगावली. आपण केवळ इक्बालच्या संबंधित मालमत्तेचा दलाल असल्याचा दावा आरोपीने केला होता. या युक्तीवादा आधारे आरोपीला दिलासा मिळू शकत नाही, असे विशेष न्यायालयाने खडसावले. आरोपीचा मुक्ततेसाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यात हा निर्णय दिला. मुंबईतील मिर्चीच्या मालमत्तेच्या बेकायदेशीर व्यवहारात त्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा करत रणजीत बिंद्राला ऑक्टोबर 2019 मध्ये ईडीने अटक केली होती.
दाऊदचा हस्तक इक्बाल
गुंड दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्चीच्या गुन्ह्याच्या प्रक्रियेतून या मालमत्ता खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. आरोपी बिंद्राने नुकतेच मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. केवळ खरेदीदाराच्या बाजूने व्यवहारात त्याने दलाली केल्याचा बिंद्राचा दावा होता. तर बिंद्राच्या स्वतःच्या विधानांवरून स्पष्टपणे दिसून येते की त्याला हे चांगले ठाऊक होते की मालमत्तांसाठी (तीन इमारती) पैशाचा मूळ स्त्रोत इक्बाल मिर्ची आणि त्याच्या साथीदारांनी 10 प्रकरणांशी संबंधित गुन्हेगारी कारवायांमधून कमावलेला पैसा होता, असा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला.
आरोपीने घेतली इक्बालची भेट
यावेळी सरकारी पक्षाने जोरदार युक्तीवाद केला. आरोपी स्वतःला केवळ दलाल असल्याचे भासवत आहे. तो स्वतःला निर्दोष असल्याचे दाखवत आहे. पण वास्तव यापेक्षा वेगळे असल्याचा दावा करण्यात आला. आरोपीची या प्रकरणात सक्रीय भूमिका दिसून येत आहे. त्याने जाणूनबुजून गुन्ह्याची रक्कम लपवून ठेवण्यास मदत केली. मिर्ची आणि त्याच्या साथीदारांच्या आरोपी संपर्कात होता, असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी आपल्या आदेशात म्हटले की, बिंद्रा याने लंडन आणि दुबईला भेट दिली आणि मिर्ची यांच्याशी भेटी घेतल्याचे पुराव्यावरून दिसून येत आहे.