अनैतिक संबंधांचा संशय, विरारमध्ये 62 वर्षीय पतीकडून 59 वर्षीय पत्नीची हत्या
पत्नीचे विवाहबाह्य संंबंध असल्याच्या संशयातून 62 वर्षीय वृद्धाने 59 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या केल्याचा प्रकार विरारमध्ये उघडकीस आला आहे
विरार : विरारमध्ये 62 वर्षीय पतीने 59 वर्षीय पत्नीची हत्या (Virar Lady Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून (Extra Marital Affair) पती किशोर फुटाणे याने पत्नीचा जीव घेतल्याचा आरोप आहे.
किशोर फुटाणे याने पत्नी सुलभा फुटाणे यांची गळा चिरुन हत्या केली. विरार पूर्वेकडील जीवदानी रोडवर असलेल्या भोईरपाडा भागातील बाळकृष्ण सोसायटीमध्ये हा प्रकार घडला.
फुटाणे दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलीचं लग्न झालेलं आहे. आरोपी किशोर फुटाणे रिक्षाचालक आहे. सुलभा फुटाणे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला संशय होता. यावरुन दोघांमध्ये अनेक वेळा वादही व्हायचे.
आज (रविवार) दुपारी बारा वाजताच्या सुमारास राहत्या घरातच फुटाणे पती-पत्नीचा वाद झाला. वादातून पतीने सुलभा यांचा गळा चिरला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
पत्नीची हत्या करुन तिला रक्ताच्या थारोळ्यात टाकून, रक्ताचे डाग अंगावर घेऊन आरोपी पती खुल्लेआम रस्त्यावरुन जात होता. जवळच असलेल्या गणपतीच्या मंडळातील सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाला. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरु केली आहे.
काहीच दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात पत्नीने पतीला भोसकून मारल्याची घटना घडली होती. पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपी पत्नी प्रणाली कदमने सुरीने वार करुन सुनिल कदम यांची हत्या केली होती.