फेरीवाल्यांकडून पैसे उकळणारा नेता काँग्रेसमध्ये असता तर मी थेट कारवाई केली असती: भाई जगताप
भाई जगताप यांनी मुंबई महानगरपालिकेने मांडलेल्या अर्थसंकल्पावर ताशेरेही ओढले. | Bhai Jagtap
मुंबई: शिवसेनेच्या नेत्यांकडून रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून परस्पर पैसे घेतले जात असल्याच्या मुद्द्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी कडाडून टीका केली. फेरीवाल्यांकडून पैसेवसुली करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. काँग्रेस पक्षातील कोणत्या नेत्याने अशाप्रकारचे कृत्य केले असते तर मी थेट कारवाई केली असती, असे भाई जगताप यांनी म्हटले. (Congress leader Bhai Jagtap slams Shivsena)
ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस 227 जागांवर स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेने मांडलेल्या अर्थसंकल्पावर ताशेरेही ओढले. पालिकेचा अर्थसंकल्प हा फुगवलेला आहे. यंदाच्या वर्षी कर वाढतील, अशी भीती मुंबईकरांना होती. मात्र, सुदैवाने तसे घडले नाही. मात्र, महानगरपालिका प्रशासन 500 फुटांखालील घरांना सरसकट करमाफी का लागू करत नाही, असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला. आता या सगळ्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेकडून खंडणी सुरु’, संदीप देशपांडेंकडून पुरावे सादर
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते फेरीवाल्यांकडून कशाप्रकारे पैसे उकळतात, याचे पुरावे आज पत्रकारपरिषदेत सादर केले. शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसंच सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा आकार… असं या पावतीवर नमूद करण्यात आल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
या खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे. महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामील आहेत का याची उच्चपदस्थ झाली पाहिजे, अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली.
संबंधित बातम्या:
…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल : संदीप देशपांडे
” कंपाऊंडर” डोक्यावर पडलेत का???” सामनातील मथळ्यावरुन संदीप देशपांडेंची खोचक टीका
‘बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेकडून खंडणी सुरु’, संदीप देशपांडेंकडून पुरावे सादर
(Congress leader Bhai Jagtap slams Shivsena)