मुंबई– हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीत सामोरे या, असे आव्हान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांनी बंडखोर आमदारांना (Rebel MLA)दिले आहे. तुमच्यात हिंमत असेल राजीनामे द्या आणि रणांगणात या, आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार तयार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. यापुढे जास्तीत जास्त महिला आमदार शिवसेनेतून (Shivsena)विधानभवनात जातील असे त्यांनी सांगितले. ही मुंबई शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचीच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगातलं हे पहिलं उदाहरण असेल जेव्हा सत्ताधारी विरोधक होत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
संपर्कात असलेल्या १७ ते १८ आमदारांना पळवून आणि कि़डनॅप करुन नेले आहे, असे त्यांच्या व्हिडिओत स्पष्ट दिसते आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांना कैद्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केली आहे. गुवाहाटीत एका बाजूला या आमदारांचा रोजचा जेवणाचा खर्च नऊ लाख रुपये आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पूरस्थितीत लोकांना जेवायचे अन्न नसल्याची टीका त्यांनी केली.
बरं झाली घाण गेली, असे सांगत आता यापुढे सगळे चांगले घडणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केली याचे वाईट वाटते असे त्यांनी म्हटले आहे. या आमदारांत जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती, ठाण्यात राहता आले नसते का, असा प्रश्नही आदित्य यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडची दोन महत्त्वाची खआती नगरविकास आणि एमएसआरडीसी सारखी खआती एकनाथ शिंदेंना दिली, यापेक्षा त्यांना काय द्यायला हवं होतं, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना सत्तेचा मोह नव्हता. अनेक जण पुन्हा येईन म्हणत असताना, अनेक मंत्री बंगले सोडत नसताना, आम्ही तातडीने वर्षा निवासस्थान सोडले, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
जेव्हा हे आमदार मुंबईत येतील तेव्हा ते चांदिवलीत उतरलीत, बांद्राहून येतील आणि वरळी, भायखळ्यातून त्यांना जावे लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही आदित्य यांनी दिला आहे. एक फ्लोअर टेस्ट आत होईल तर दुसरी बाहेर होईल असे संकेत त्यांनी दिलेत. तसेच केंद्र सरकार ही टेस्ट घडवून आणण्यालाठी केंद्रीय बळाचा वापर केरल असे संकेतही त्यांनी दिलेत.