मान्सूनची मोठी अपडेट : अखेर तो येणार… ‘या’ तारखेला राज्यात मान्सूनची धडक; पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्रात उष्णतेची लाट
मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करावा लागणाऱ्या मुंबईकरांना आजचा दिवस दिलासा मिळणार आहे. आज दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची काहिली थांबणार आहे. तसेच आजपासून तीन दिवसात राज्यातील काही भागात पाऊस येणार आहे. मात्र, राज्यात मान्सूनची खरी दस्तक जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला घराबाहेर पडताना पूर्ण तयारीनेच पडावं लागणार आहे.
मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार आहे. येत्या 8 ते 12 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून महाराष्ट्रात येण्यासाठी 20 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत राज्यातील काही शहरांत तापमान जवळपास 44 अंशाच्या जवळ असणार आहे. परभणी आणि अकोल्यात तापमान 44 अंशावर जाण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील लोक आधीच उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच आता हवामान खात्यानेही उष्णेतेच्या लाटेचा अंदाज वर्तवल्याने या भागातील लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.
तीन दिवसात पाऊस
मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांची आजच्या दिवस का होईना उकाड्याच्या काहिलीतून सुटका झाली आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
वादळी वारे वाहणार
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमरावतीत पाऊस
विदर्भासह अमरावती जिल्ह्यात 24 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर कालअमरावती शहर, वलगावसह ग्रामीण भागात तुफान वादळी पाऊस झाला. विदर्भातील अमरावती, यवतमाळ ,वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना मात्र काही प्रमाणात उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.