मुंबई : आज येईल, उद्या येईल म्हणून ज्या पावसाकडे मुंबईकर चातकासारखे डोळे लावून बसला आहे, तो पाऊस आता तुमच्या दारात आला आहे. मुंबईत पाऊस कधी बरसणार याबाबतची मोठी अपडेट भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली आहे. मुंबईत आजपासून म्हणजे 23 जूनपासून पावसाचे आगमन होत आहे. मुंबईत आज काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाचा शिडकावा अंगावर घेता येणार आहे. आजपासून पाऊस सुरू होणार असल्याने मुंबईकरांची जीवघेण्या गर्मीतून सुटकाही होणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत 23 ते 25 जून दरम्यान पाऊस होणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मुंबईत पाऊस लांबला आहे. मात्र, उशिरा का होईना आता पाऊस सुरू होणार असल्याने सर्वांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने आजपासून मुंबईत पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला असला तरी हा अंदाज खरा ठरणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण निसर्गात कधी काय घडेल याचा काही भरवसा नाही. त्यामुळे हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरणार की नाही हे पाहावं लागणार आहे.
मुंबईत आजपासून पाऊस पडण्याचा अंदाज असला तरी महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. आज मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण राज्यात 25 जून पासून पाऊस सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
latest obs by IMD Nagpur radar at 5.45 pm today, indicating mod to severe thunder clouds around.
Watch for Nowcast by IMD pl pic.twitter.com/L0Amclx2Jw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 22, 2023
पावसाने ओढ दिल्याने नंदूरबार जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन जूनच्या चौथ्या आठवड्यात होणार असल्याची अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी कापसाची काही प्रमाणात पूर्व हंगामी लागवड केली आहे. मात्र जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर उर्वरित पेरण्यांना गती मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी राजा आता पावसाच्याच प्रतिक्षेत आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर तालुक्यात काल सांयकाळच्या सुमारास पावसाचे आगमन झालं. माहूर तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्याने आनंदाचे वातावरण पसरलंय. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा होती, ती काल आलेल्या पावसाने संपवलीय. माहूर तालुक्यात कुठे मध्यम तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसलाय. त्यामुळे उकाड्यापासून माहूर तालुक्याला काहीसा दिलासा मिळालाय.