परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात, जेएनपीटी बंदरात 600 टन कांदा दाखल
पावसामुळं कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची कमतरता भासत आहे. अशास्थितीत कांद्याच्या दरात वाढ होत आहे. कांद्याचे वाढणारे दर कमी करण्यासाठी आणि मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्यात येत आहे.
नवी मुंबई: पावसामुळं कांद्याच्या पिकाचं झालेलं नुकसान आणि त्यामुळं बाजारात निर्माण झालेली कांद्याची टंचाई या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत कांद्याचे भाव वाढले आहेत. हे दर नियंत्रणात आणण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी परदेशातून कांद्याची आयात सुरु केली आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आज इराणमधून 25 टन कांद्याचा एक कंटेनर दाखल झाला. इराणमधील या कांद्याला 50 ते 60 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला. तर आपल्याकडील कांद्याला घाऊक बाजारात 60 ते 75 रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळाला. दरम्यान कांद्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करण्यात आली आहे. जवळपास 600 टन कांदा सध्या जेएनपीटी बंदरात दाखल झाला आहे. (Import of 600 tons of foreign onions at JNPT port )
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांजवळ केवळ 25 टक्के कांदा शिल्लक होता. त्यामुळं पावसाळ्यापासूनच कांद्याची कमतरता जाणवत होती. तरीही कांदा पुरेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही होती. पण पावसामुळं नव्याने लावलेलं कांद्याचं पिकही काही ठिकाणी खराब झालं. त्यामुळं बाजारात कांद्याची टंचाई भासत असल्यानं परदेशातून कांदा आयात करण्याची वेळ आली आहे.
बाजारात यापूर्वीही अनेकदा इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तानातून कांद्याची आयात करण्यात आली होती. सध्या परदेशातून कांद्याची आवक होत असली तरी ग्राहकांकडून मात्र देशी कांद्यालाच पसंती मिळत आहे. त्यामुळं देशी कांद्याला सध्या बाजारात 60 ते 75 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. तर परदेशी कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. सोमवारी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये देशी कांद्याच्या १०० गाड्यांची आवक झाली.
संबंधित बातम्या:
कांदा आयात केल्यास केंद्र व राज्यातील मंत्र्यांना फिरकू देणार नाही, शेतकरी संघटनेचा इशारा
आयकर विभागाच्या छाप्यांमुळे व्यापारी भयभीत, कांदा लिलाव ठप्प, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
Import of 600 tons of foreign onions at JNPT port