– निवृत्ती बाबर
मुंबई : वरळीत बेस्टचे दोन स्टॉप हलवण्यात आले आहेत, त्यावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झालं आहे. वरळी हा शिवेसना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्षे वरळी परिसरात सिमेन्स कंपनीच्या कार्यालयाजवळ कॉ. पी. के. कुरणे चौकाजवळ बेस्ट उपक्रमाचे दोन थांबे होते. हे थांबे हलवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र लिहून बस थांबे लवकर पूर्वरत करावेत अशी मागणी केली आहे. बंद केलेल्या बस स्टॉपजवळच बेस्टचे बस आगार आहे. या आगारातून ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर दादर, भोईवाडा, परळ आदी भागात बस जातात.
बिल्डरच्या फायद्यासाठी हे केलं जातंय का?
परळ, हिंदमाता दादर, प्रभादेवी, वांद्रे परिसरात जाणाऱ्या बस कॉ. पी. के. कुरणे चौकातील थांब्यावर उभ्या राहात होत्या. या बसथांब्यावर थांबणाऱ्या बसमधून प्रवासी मोठ्या संख्येने येत होते. पण आता प्रवाशांना समस्या होणार आहेत. लवकरात लवकर हे बस स्टॉप पूर्ववत करण्यात यावे, अन्यथा आम्ही विधानपरिषदेत प्रश्न मांडू, तसेच बिल्डरच्या फायद्यासाठी हे केलं जातंय का? असा सवाल सचिन अहिर यांनी विचारलाय.
NOC कोणाला दिली?
“नागरिकांचे हाल होतायत. लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही आक्रमक होणार. सत्तांतर झाल्यानंतर बेस्टच धोरण बदललं, महापालिका धोरणात बदल झाला, कॉ. पी. के. कुरणे चौक बस स्टॉपचा लौकीक होता” असं विधान परिषदेतील शिवसेनेचे आमदार सचिन अहिर म्हणाले. “88 नंबर, 134 नंबरची बस इथून जायची. वडाळा, कुर्ला, धारावीला बसेस इथून जात होत्या. लोकांना कनेक्टिविटी मिळत होती. आम्ही तक्रार केली, तेव्हा सांगितलं की, बसेस बंद होणार नाहीत. फक्त बस डेपो पुढे जाईल, बस डेपो काढायची काय गरज होती? हे सर्व टॉवरसाठी चाललय काय ? त्यांच्या सुविधेसाठी, त्यांच्या कारसाठी हे सर्व चाललय का? बेस्ट विशेष करुन महापालिकेने NOC कोणाला दिली? हे लोकप्रितिनिधी म्हणून आम्हाला ठाऊक नाही” असं सचिन अहिर म्हणाले.
ते काही बोलत का नाही?
“आम्ही याचा निषेध करतो. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला भांडावं, झगडावं लागतय हे दुर्देवी आहे. आजूबाजूचे सत्ताधारी लोकप्रतिनिधी झालेत, त्यांची नजर वरळीच्या विकासावर आहे. ते काही बोलत का नाही? ते झोपलेत का?” असा सवाल सचिन अहिर यांनी विचारला.