बारा दिवसात त्याने ताजनंतर चित्रित होणाऱ्या इमारतीचे मॉडेल साकारले
विशेष म्हणजे अवघ्या 12 दिवसात हे किचकट काम त्याने लिलया पूर्ण केले आहे. त्याची ही नयनरम्य कामगिरी आता सीएसएमटीच्या हेरीटेज गॅलरी प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्यालय ( Central_railway ) असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( CSMT ) या देखण्या इमारतीची तितकीच देखणी प्रतिकृती एका पंचवीस वर्षांच्या इंजिनिअर तरूणाने अवघ्या 12 दिवसात तयार केली आहे. आकाश कांबळे असे त्याचे नाव असून रेल्वे गाड्या आणि इंजिनांचे आकर्षक मॉडेल बनविण्याचा छंदच त्याला जडला आहे.
अंबरनाथ येथे राहणाऱ्या 25 वर्षीय आकाश कांबळे या तरूणाने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान प्राप्त असलेल्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे कार्डबोर्डपासून हुबेहुब मॉडेल तयार केले आहे.
विशेष म्हणजे अवघ्या 12 दिवसात हे किचकट काम त्याने लिलया पूर्ण केले आहे. त्याची ही नयनरम्य कामगिरी आता सीएसएमटीच्या हेरीटेज गॅलरी प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे.
आकाश याने पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून मॅकेनिकल इंजिनिअर डिग्री घेतली आहे, त्याने मोनोरेलच्या स्थानकात स्टेशन मॅनेजर म्हणून जॉबही केला आहे.
आकाश याला पू्र्वीपासूनच ट्रेन आणि इंजिनच्या विविध छोट्या प्रतिकृती तयार करण्याचा छंद आहे. मात्र,लॉकडाऊनमध्ये त्याने अधिक कसोशीने हे तंत्र आत्मसात केल्याचे तो सांगतो. सीएसएमटी इमारतीचे मॉडेल तयार करण्यासाठी आपण सनबोर्ड आणि कार्डबोर्डचा वापर केल्याचे तो सांगतो.
यापूर्वी त्याने डेक्कन क्वीन तसेच एसी लोकल तसेच विविध ट्रेन इंजिन्सची मॉडेल्स तयार केली आहेत. आपण कार्डबोर्ड तसेच धातूचाही वापर मॉडेल बनविण्यासाठी केल्याचे आकाश याने सांगितले.
ब्रिटीशकाळात 1888 मध्ये आर्कीटेक्ट एफ.डब्ल्यू. स्टीव्हन यांनी ही इमारत बांधली होती. या इमारतीचे मॉडेल बनविण्याचे माझे स्वप्न होते. ते मी 12 दिवसांत पूर्ण केल्याचे आकाश याने टीव्ही नाइन मराठीशी बोलताना सांगितले.