गाडीला धडक दिल्याच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी ठोकल्या पाच तासात आरोपीला बेड्या
मारहाणीत जागीच बेशुद्ध पडलेल्या भरत उर्फ सोनू पाटडीया याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले
उल्हासनगर: गाडीला धडक दिल्याचा आरोप करत दुचाकीस्वाराने एका तरुणाला मारहाण (Beating) करत त्याची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 5 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातून सोमवारी रात्री आकाश संचेरिया भाजी विक्रेता त्याचा तरुण मित्र भरत उर्फ सोनू पाटडीया याच्यासोबत तीन चाकी टेम्पोने (Tempo Driver) जात होता. यावेळी त्यांच्या मागून करण जसूजा हा तरुण दुचाकीवरून आला आणि त्याने या टेम्पोसमोर दुचाकी आडवी लावत तुम्ही माझ्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप केला. तसंच टेम्पो चालवत असलेल्या आकाश संचेरिया याला त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे वाद सुरु असताना भरत उर्फ सोनू पाटडीया हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी करण जसुजा याने त्याला खाली पाडून मारहाण केली. या मारहाणीत जागीच बेशुद्ध पडलेल्या भरत उर्फ सोनू पाटडीया याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
पोलिसांचे नेटवर्क
याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. दुचाकी चालक हा अनोळखी असल्याने त्याचा माग काढता येत नव्हता. मात्र उल्हासनगर पोलिसांनी आपले नेटवर्क वापरून अवघ्या 5 तासात दुचाकीचालक करण जसुजा याला बेड्या ठोकल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणार
दुचाकीचालक करण जसूजा याच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. कोणताही धागादोरा अवघ्या काही तासात उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यानं पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.