मोठी कारवाई, IT चा छापा, उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याला ज्याने कर्ज दिल्याचा आरोप…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ज्यांनी कर्ज दिल्याचा आरोप आहे त्या नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याविरोधात आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : आयकर विभागाकडून आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुष्पक बुलियन केसमध्ये नाव समोर आलेल्या नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नंदकिशोर हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध ईडी आणि आयकर विभागाकडून सुरु आहे. ईडीकडून तपास सुरुच होता. पण आता आयकर विभागाकडूनही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नंदकिशोर चतुर्वेदी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंधित शेल कंपन्यांवर आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत. ईडीकडून सुरु असलेल्या पुष्पक बुलियन केसमध्ये नंदकिशोर चतुर्वेदी यांचं नाव समोर आलं होतं. चतुर्वेदी सध्या फरार आहेत.
नंदकिशोर चतुर्वेदी हे उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील रवहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ते पेशाने सीए आहेत. ते हमसफर डिलर्स नावाची बनावट कंपनी चालवत असल्याचा आरोप आहे. याच कंपनीच्या नावे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कर्ज दिल्याचा आरोप आहे.
नंदकिशोर चतुर्वेदींवर हवाला व्यवहार, मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. यामध्ये बनावट कंपन्या बनवल्याचा आरोप आहे. तसेच कोलकात्यात कार्यालयं तयार केल्याचा आरोप आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हे 2017 पासून ईडीच्या रडारवर आहेत. ते सध्या फरार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
चतुर्वेदींविरोधात तपास सुरु असताना पाटणकर यांची मालमत्ता जप्त
ईडीने वर्षभरापूर्वी पुष्पक बुलियन प्रकरणाचा तपास केला होता. त्या तपासात नंदकिशोर चतुर्वेदी हे नाव समोर आलं होतं. चतुर्वेदींनी श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप आहे. चतुर्वेदींचा शोध सुरु असताना श्रीधर पाटणकर यांची ठाण्यातील काही संपत्ती जप्त करण्यात आली होती.
आयकर विभागाचं अनेक शहरांमध्ये सर्च ऑपरेशन
नंदकिशोर चतुर्वेदींवर आता आयकर विभागाकडूनही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनऊ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी आयकर विभागाचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याशी संबंधित ज्या शेल्स कंपन्या आहेत त्या बनावट असल्याचा आरोप आहे. त्याच कंपन्यांवर छापेमारीची कारवाई केली जातेय. नंदकिशोर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फरार आहेत. त्यांचा शोध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु आहे.