Ganoshotsav 2022 : यंदा गणेशोत्सवात चाकरमान्यांची दमछाक! रेल्वे, एसटी फुल्ल, खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे वाढले
यंदा सर्वच सण, उत्सव हे धुमधडाक्यात साजरी होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मुंबईतून आपल्या गावी कोकणात जातात. मात्र यंदा त्यांना कोकणात पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई : देशावर गेले दोन वर्ष कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोना काळात अनेक उत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी (Ganoshotsav) कोकणात जाता आले नाही. मात्र यंदा कोरोना संकट कमी झाल्याने सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवण्यात आल्याने यंदा सर्वच सण, उत्सव हे धुमधडाक्यात साजरी होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मुंबईतून आपल्या गावी कोकणात जातात. मात्र यंदा त्यांना कोकणात पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. एक तर तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा होत असल्याने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे आणि एसटी फूल्ल झाल्या आहेत.
तिकिटांचे दर वाढले
दोन वर्षानंतर प्रथमच यंदा गणेशोत्सव साजरा होत असल्याने कोकणात जाण्यासाठी नोकरदार वर्गामध्ये मोठा उत्साह आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आधीच सर्व रेल्वे आणि बस फूल्ल झाल्या आहेत. रेल्वे आणि बसचे आरक्षण फूल्ल झाल्याने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी आता आपला मोर्चा हा ट्रॅव्हल्सकडे ओळवला आहे. याच संधीचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदारांनी देखील आपल्या तिकिटांच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. ट्रॅव्हलचे दर वाढल्याने चाकरमान्यांना प्रवासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. तर अनेक जण मिळेल त्या वाहनाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असल्याचे पहायला मिळत आहेत.
खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल इथेच संपत नाही तर त्यांना आणखी एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा. मुंबई-गोवा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने प्रवास धोकादायक झाला आहे. रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने प्रवासाच्या वेळेत जवळपास दीड ते दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीची मागणी सुरू आहे. मात्र त्याला काही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.