मुंबई : मुंबईत उद्या आणि परवा असे दोन दिवस INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते मुंबईत दाखल होत आहेत. देशातील 26 विरोधी पक्षांची मिळून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या टर्ममध्ये सत्ता मिळवण्यापासून रोखणं हा इंडिया आधाडीचा मूळ उद्देश आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीआधी संयोजक पदाची चर्चा आहे. कारण अजून संयोजक पदाबाबत निर्णय झालेला नाही. नितीश कुमार यांनी संयोजक पद स्वीकारायला नकार दिला.
आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव चर्चेत आहे. नव्या माहितीनुसार, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत संयोजक पदाबाबत कुठलाही निर्णय होणार नाहीय. पण एका कमिटीची स्थापना होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडिया आघाडीत संयोजक पदावरुन मतभेद वाढू लागले आहेत. त्यामुळे ही आयडियाच ड्रॉप केली जाऊ शकते. संयोजकपदाच्या जागी 11 लोकांची कोऑर्डिनेशन कमिटी स्थापन केली जाऊ शकते. हीच समिती आघाडीबद्दल महत्त्वाचे निर्णय घेईल.
संयोजक पद काँग्रेसला देण्यास कुठल्या पक्षांचा विरोध?
काँग्रेसला स्वत:शिवाय दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला संयोजक पद देणं मान्य नाहीय, अशी चर्चा आहे. तृणमुल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने इंडियाच नेतृत्व काँग्रेसला सोपवायला विरोध केलाय. त्यामुळेच या पदावरुन संघर्ष होत आहे. याआधी संयोजकपदावरुन नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं वक्तव्य समोर आलं होतं. त्यावरुन इंडिया आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याच स्पष्ट झालं.
मुंबईच्या बैठकीत काय ठरणार?
लोकसभा निवडणूक 2024 आधी अनेक विरोधी पक्ष एकत्र आलेत. इंडिया नावाची आघाडी त्यांनी ,स्थापन केलीय. या गटाच्या दोन बैठका झाल्या आहेत. तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीत इंडियाचा झेंडा आणि लोगोवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. शिवसेना, महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या बैठकीचे यजमान आहेत.
आधी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना संयोजक बनवलं जाणार आहे, अशी चर्चा होती. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांचं वक्तव्य समोर आलं. इंडिया आघाडीत एक नाही, अनेक संयोजक होऊ शकतात. त्यावेळीच संयोजक पदावरुन मतभेद असल्याच स्पष्ट झालं. इंडिया आघाडीत सध्या दोन डझन पक्ष आहेत. पुढच्या बैठकांमध्ये आणखी नवीन पक्ष सहभागी होऊ शकतात. लोकसभा निवडणूक 2024 साठी सीट शेअरींग फॉर्म्युला निश्चित झालेला नाही.