…आणि आता अंधांसाठी भारतीय राज्यघटना सोप्पी झाली!
ब्रेल लिपीतील भारतीय संविधानाचे प्रकाशन सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झालं.
मुंबई : ब्रेल लिपीतील भारतीय संविधानाचे प्रकाशन सामाजिक न्याय विकासमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झालं. भारतीय संविधानाचे ब्रेल लिपीत रुपांतर करुन ते अंध बांधवांना उपलब्ध करुन देण्याचे मोलाचे काम झाले आहे. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दिव्यांगांसाठी अशा नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करताना विशेष आनंद वाटतो, अशा भावना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या. (Indian Constitution is now in Braille Script, published by Minister Dhananjay Munde and Bacchu Kadu)
ठाण्यातल्या अस्तित्व फाऊंडेशन या दिव्यांग निराधारांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थेमार्फत दिव्यांगांसाठी ब्रेल संविधान तयार केले असून मंत्रालयात आयोजित प्रकाशनाच्या सोहळ्यात धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू तर भिवंडीचे आमदार रईस शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न बाकी आहेत. पूर्वी चळवळीच्या माध्यमातून बच्चूभाऊ व आम्ही आंदोलने केली. आता मंत्री म्हणून विभागाच्यामार्फत या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावायचे आहे. त्यानुसार काम सुरु आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या महाशरद पोर्टलचीही धनंजय मुंडे यांनी यावेळी माहिती दिली. या महाशरद पोर्टलवर दिव्यांग बांधवांना माणूस म्हणून समाजात जगण्यासाठी सर्व साधने असून ती देणाऱ्या दानशूर व्यक्तींची नावे असल्याचं मुंडे म्हणाले.
अंध बांधव ब्रेल लिपीतील संविधान आता स्पर्शाने वाचू शकतील, ही मोठी ताकद आहे. त्याबद्दल ब्रेल लिपीतील संविधान तयार केलेल्यांचे आभार व अभिनंदन, या शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अस्तित्व फाऊंडेशनचे ब्रेल लिपीतील संविधान निर्मितीबद्दल कौतुक केले.
गेल्या कित्येक वर्षापासून मी दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी लढत आहे. तो लढा अजूनही सुरु आहे. गेल्या वर्षभरात आम्ही दिव्यांगांसाठी 32 शासन निर्णय निर्गमीत केले. त्याचा मोठा लाभ होईल, असं बच्चू कडू म्हणाले.
(Indian Constitution is now in Braille Script, published by Minister Dhananjay Munde and Bacchu Kadu)
संबंधित बातम्या
…तर आज तुम्हाला हा धनंजय मुंडे दिसला नसता, धनंजय मुंडेंचं मोठं विधान