मुंबईत 13 मजली इमारतीच्या छतावर अडकला भलामोठा अजगर, कसे झाले रेस्क्यू ऑपरेशन ? पहा….
मुंबईतील एका 13 मजली टॉवरच्या छतावर एक भलमोठ्ठा इंडियन रॉक अजगर सापडल्याने एकच खळबळ माजली. बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मुश्किलीने त्याची सुटका केली.
मुंबई | 28 जुलै 2023 : एका १३ मजली इमारतीच्या (13 th floor) छतावर मोठा अजगर (python found) सापडल्याने एकच खळबळ माजली. घाटकोपर पश्चिमेकडील या इमारतीच्या छतापर्यंत चार फूट लांबीचा एक इंडियन रॉक अजगर (Indian Rock Python) पोहोचला. तो पाहून सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली. अखेर बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या कष्टाने त्याला वाचवले आणि सुखरुपपणे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त केले. मात्र हा अजगर एवढ्या उंच टॉवरच्या छतापर्यंत पोहोचला कसा ? याबद्दल सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत.
रिपोर्टनुसार, मुंबईतील एका आयटी फर्ममध्ये काम करणारे प्राणी कार्यकर्ते सूरज साहा यांच्या सांगितले की मंगळवारी घाटकोपर पश्चिमेकडील एलबीएस रोड वरील एका इमापरतीच्या बिल्डींगच्या छतावर एक इंडियन रॉक अजगर आढळला. तेथे काही बांधकाम सुरू असल्याने ओलं सिमेंट होतं, आणि तो अजगर त्याच सिमेंटमध्ये पूर्णपणे दबला होता. त्याला वाचवण्यासाठी आम्ही लगेच राज्य वन विभागाशी संपर्क साधला.
असे झाले रेस्क्यू ऑपरेशन
अजगराची माहिती मिळताच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि अजगराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुंबई परिक्षेत्राचे वन अधिकारी राकेश भोईर यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले. इंडियन रॉक अजगर ही संरक्षित वन्यजीव प्रजाती आहे, त्यामुळे त्याचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे. सुदैवाने, ज्या लोकांनी अजगर पाहिला त्यांनी त्याला कोणतीही हानी पोहोचवली नाही, यावरून लोकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकतेची वाढत असल्याचे दिसून येते. काळजीपूर्वक बचाव कार्यानंतर, या अजगराला सुरक्षितपणे वनविभागाकडे परत सोपवण्यात आले.
सहा यांनी लोकांच्या या जबाबदार वर्तनाचे कौतुक केले. तसेच सापांना इजा करणे किंवा मारणे बेकायदेशीर असल्याचे सांगत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी या प्राण्यांचे संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पावसाळ्यात रहा अलर्ट
वन्यजीव तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मुसळधार पावसामुळे साप आणि इतर प्रजातीच्या बिळांमध्ये पाणी भरतं. त्यामुळे ते रहिवासी भागांत ऊंच जागा शोधत बिल्डींगच्या छतापर्यंत जातात. तसेच इंडियन रॉक अजगर हे जंगली भागात त्यांच्या झाडांवर आणि अगदी खडकाळ पृष्ठभागावर सहजतेने चढण्यासाठी ओळखले जातात.