उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट, बारसू रिफायनरी संदर्भात नेमकी काय चर्चा झाली ते सविस्तर सागितलं
काल बारसू रिफायनरी येथील आंदोलकांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली. त्यानुसार आज शरद पवार यांना भेटण्याचं ठरलं होतं.
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीग्रस्त आंदोलकांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवार यांना सांगितलं. त्यानंतर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. उदय सामंत यांनी राज्य सरकारची काय भूमिका आहे, हे शरद पवार यांना सांगितले. यासंदर्भात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, काल बारसू रिफायनरी येथील आंदोलकांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाली. त्यानुसार आज शरद पवार यांना भेटण्याचं ठरलं होतं. तिथली वस्तूस्थिती काय आहे, हे शरद पवार यांना सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होते, असं उदय सामंत यांनी म्हटलं.
आंदोलकांचे गैरसमज दूर केले जातील
उदय सामंत म्हणाले, आंदोलनकर्त्यांचा गैरसमज दूर झाल्याशिवाय बारसू रिफायनरी हा प्रकल्प पुढे रेटणार नाही. त्या संदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे रिफायनरी संदर्भातील काही गैरसमज आहेत. ते कशा पद्धतीने दूर करता येतील, यासंदर्भात चर्चा झाली.
शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही
बारसू या रिफायनरी प्रकल्पात शेतकऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. काही शंका आंदोलकांनी शरद पवार यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यावर सविस्तर चर्चा झाली. शासन आंदोलकांच्या प्रमुखांशी बोलायला तयार आहे. स्थानिकांशी बोलूनच पुढील निर्णय घेतला जाईल. कुणासोबतही जबरजस्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
सध्या फक्त मातीपरीक्षण
हे फक्त मातीपरीक्षण आहे. त्यानंतर कंपनी ठरविलं की प्रकल्प होणार की, नाही. नोटीस मागे घेण्यासंदर्भात शासन चर्चा करायला तयार आहे. एक-दोन दिवसांत शंका दूर केल्या जाऊ शकत नाही. संवादाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी याबाबत स्वतः पुढाकार घेतला असल्याचंही उदय सामंत म्हणाले.
शरद पवार हे चारवेळी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळात अनेक प्रकल्प झाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबाबत सविस्तर शरद पवार यांना सांगितले आहे. उदय सामंत म्हणाले, काल रत्नागिरी येथे बैठक झाली. खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तिथल्या प्रकल्पग्रस्तांची समजूत काढा, असं त्यांचं म्हणणे आहे.
कोणत्याही राजकीय मुद्यावर चर्चा नाही
बारसू रिफायनरीच्या मुद्यांवर भेट घेतली. कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. तो विषय कोकणाच्या रिफायनीसंदर्भात होता, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.